Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticsUpdate : शिंदे – आंबेडकर भेटीविषयी दोघांचेही खुलासे , “ती भेट राजकीय नव्हती …”

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला भेट दिली.  यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी  या भेटीमागे कुठलेही राजकारण नसल्याचा निर्वाळा दिला आहे. दरम्यान या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या भेटीत इंदू मिलच्या जागी उभ्या राहणाऱ्या स्मारकाबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती  दिली आहे.


दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना यावेळी भाजपाशी युती करण्यासंबंधी विचारण्यात आले  असता त्यांनी हा शक्यता फेटाळून लावली. आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे असे  सांगत शिंदे गटाशी युती करण्याचा दावाही फेटाळून लावला.

आंबेडकर यांनी स्पष्ट केले की , “आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजरचनेसंबंधी आमचे  भांडण आहे. जोपर्यंत त्यासंबंधी विचार केला जात नाही तोपर्यंत भाजपासोबत जाण्याचा संबंध नाही. जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे.”

ठाकरे गटाशी युती नाही : प्रकाश आंबेडकर

दरम्यान ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की “महाविकास आघाडीमधील काही घटक यांची माझ्याशी चर्चा झाली. त्या चर्चेत मी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती”.

“नाना पटोलेंनी काँग्रेस एकटे  लढणार असल्याचे  म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहात की आमच्याशी प्रत्येकजण वेगळे बोलणार आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले  आहे. पण अद्याप महाविकास आघाडीच्या घटकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,” अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

“२० तारखेचा पोर्टल उद्घाटनाचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी आधीच ठरला होता. प्रबोधनकार यांच्याशी संबंधित नवे  पोर्टल आहे. प्रबोधनकार आणि बाबासाहेब यांचे संबंध जवळचे असल्याने त्यांनी या पोर्टलच्या उद्धाटनास येण्याची विनंती केली होती. त्यासाठी मी होकार दिला असून, हजर राहणार आहे. पण महाविकास आघाडीचे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचे पुढे काय होईल असं दिसत नाही,” असे  प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे काही नेते भेटून गेले होते, त्यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेशी राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांचे काही नेते भेटले हे खरे आहे. पण ही भेट फक्त २० तारखेच्या कार्यक्रमासंबंधी होती,  असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

दरम्यान मुंबईतील राजगृह येथे प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली ही वास्तू पाहिली. यात कोणतेही राजकारण नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती.”


“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचे  भूषण आहे. त्यांचे  वास्तव्य असलेली ही वास्तू पाहिली आणि सदिच्छा भेट दिली,” अशी माहिती देऊन शिंदे म्हणाले की, या भेटीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. शिंदे पुढे म्हणाले की, “राजगृहाची ही इमारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभी राहिली आहे. बाबासाहेबांनी आर्किटेक्चरची मदत न घेता कोणत्याही खांबाशिवाय ही इमारत उभी केली.”

“राजगृहमध्ये बाबासाहेबांच्या वाचनाची खोली, अभ्यासाचा टेबल, बसण्याची खुर्ची, सर्व पुस्तके  आणि इतर सर्व बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू पाहिल्या. त्या आजही जशाच्या तशा आहेत. हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो आज मुख्यमंत्री म्हणून मला पाहायला मिळाला,” असे  एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!