BharatJodoYatraUpdate : हे राज्य सावरकरांचे आहे हे दाखवा , राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबवा : खा. राहुल शेवाळे

मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवा. हे राज्य कायद्याचे आणि सावरकरांचे आहे असे दाखवून देऊया. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून या यात्रेला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवण्याची मागणी केली आहे. कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रा कुणाला थांबवण्याचा अधिकार दिला आहे का, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कोणीही थांबवू शकत नाही असेही ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितले.