Current News Update | राजीव गांधी यांच्या हतयऱ्यांची सुटका… सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Current News Update : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांड प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरपी नलिनी श्रीहरन,रविचंद्रन मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पॉयस यांची सुटका करण्याचे आदेश आज (11.11.2022) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुटका करण्यात आलेली दोषी महिला नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर नलिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकेत म्हटले आहे, या निर्णयात तुरुंगातील वागणुकीचा ही विचारात करण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांवर बंधनकारक असतो, मात्र चार वर्षांपासून राज्यपालांनी कारवाई केली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुटका करण्याचे आदेश दिले आहे.
सुनावणीदरम्यान तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून राजीव गांधी हत्येतील दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचे समर्थन केले होते. १७ जून रोजी मद्रास उच्च न्यायालयाने दोषींच्या याचिका फेटाळल्या होत्या. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला नलिनी श्रीहर आणि आरपी रविचंद्रन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले होते. दोन्ही दोषींनी त्यांच्या याचिकेत एजी पेरारिवलन यांच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.