MaharashtraNewsUpdate : ‘वेडात वीर दौडले सात’ आणि ‘हर हर महादेव’ ला छत्रपती संभाजी यांचा विरोध , थेट कारवाईचा इशारा

पुणे : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ आणि सुबोध भावे यांची भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटांवर गंभीर आक्षेप घेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी विरोध करताना चित्रपट निर्मात्यांवर “संभाजीराजे आणि उदयनराजेंचा पाठिंबा आहे,” असे खोट दाखवल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही नमूद केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडताना काही चुकीचे दाखवत असाल तर गाठ माझ्याशी आहे असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
या चित्रपटाच्या निमित्ताने यांनी मध्येच मराठे आणि मराठी असे काहीतरी सुरू केले आहे. पूर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वजण आहोत. सर्व अठरा पगडजात बारा बलुतेदार म्हणजेच मराठे आहेत. हे मराठे आणि मराठी कोठून आले ? मराठा ही काही जात नव्हती. हे यापुढे चालणार नाही आणि चालू देणार नाही. हे खपवून घेणार नाही, वेळ पडली तर गाठ माझ्याशी आहे,” असा इशाराही संभाजी राजे यांनी यावेळी दिला. दरम्यान “कोणी आडवं आलं तर पुढचं पुढं बघू. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केला, मोडतोड केली तर संभाजी छत्रपती खपवून घेणार नाही,” असा इशाराही संभाजीराजे छत्रपतींनी दिला.
या चित्रपटाला राज ठाकरेंचा व्हॉईस ओव्हर आहे याबाबत विचारले असता संभाजीराजे म्हणाले, “पत्रकारांनी मला माझ्याविषयीचे प्रश्न विचारावेत. मी त्यांची उत्तरे द्यायची का? मी त्यांची उत्तरे देणार नाही. मला माझ्याविषयी विचारा.” राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे त्या चित्रपटाच्या लाँचिंगच्या वेळी स्टेजवर होते. यावर विचारले असता संभाजीराजे म्हणाले, “मग आपण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना इथे बोलवू आणि एकत्रित पत्रकार परिषद घेऊ. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार नाही. त्याची काहीही गरज नाही. त्यांच्याकडे सेन्सॉर बोर्ड आहे. त्यांनी तिथे इतिहासाची समिती नेमावी.”
यावेळी पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मला जे बोलायचे आहे ते मी बोललो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना माझी पत्रकार परिषद दाखवा. त्यांना माझ्या भूमिकेत काही चुकीचे वाटत असेल तर त्यांनी सांगावे.”“राज ठाकरेंनी चित्रपटाचं कौतुक केले , त्याविषयी त्यांना विचारा”
“माझी भूमिका ही माझी भूमिका आहे.
“मी शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या घराण्याची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. यात एकही टक्का बदल होणार नाही.उद्या परत असा चित्रपट काढला, तर मी आडवा येईल. त्यावेळी आणखी कोण आडवं येतं ते बघू,” असा थेट इशाराच संभाजीराजेंनी दिला.
अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
महेश मांजेरकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटातील इतर कलाकारांचा लूकही दाखवण्यात आला आहे. प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबरीने महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर आणि महेश यांची मुलगी गौरी इंगवलेही या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.