MaharashtraNewsUpdate : १७९६ तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान , वर्षभरात ७५ हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध : मुख्यमंत्री

मुंबई । राजू झनके : रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव साप्रवि (सेवा) नितीन गद्रे, प्रधान सचिव वलसा नायर सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, “राज्याच्या दृष्टीने आज आनंद सोहळा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दहा लाख रोजगार उपलब्ध करण्याचे जाहीर केले. राज्यांनीही यास प्रतिसाद देण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार प्रतिसाद देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून येत्या वर्षभरात ७५ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात कोकण विभागीय कार्यक्रमात आज सुमारे ६०० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून राज्यात सुमारे दोन हजार उमेदवारांना विभागीय पातळीवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे”.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांना आवाहन केले होते की, देशात अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. राज्यांनीही आपल्या रिक्त पदावर तरूण-तरूणींना रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रातही ७५ हजार रिक्त जागा आम्ही भरणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. गेल्या काही वर्षात शासकीय पदभरतीवर काही निर्बंध होते. आता हे निर्बंध शासनाने उठवले असून राज्यातील ७५ हजार तरूण-तरुणींना शासकीय नोकरी मिळणार आहे. नवीन युवा पिढी प्रशासनात आली तर शासन देखील गतिमान पध्दतीने काम करू शकते यासाठी ही पदभरती आवश्यक आहे, असे ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रधानमंत्र्यांमडून कौतुक
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे संदेश दिला. नियुक्तीपत्र प्राप्त उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, महाराष्ट्र शासन रोजगार देण्याच्या संकल्पाकडे एका ध्येयाने मार्गक्रमण करीत आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. केंद्र शासनाने दहा लाख नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरूवात केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही आज सामूहिक नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात गृह आणि ग्रामविकास विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, ही बाब अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले.
रोजगार मेळाव्याबाबत माहिती
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित ७५ हजार पदांची भरती करण्याचा राज्यशासनाचा मानस आहे. आज पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील सुमारे ६०० उमेदवारांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नियुक्ती आदेश प्रदान. निवड झालेल्या इतर उमेदवारांना राज्यातील उर्वरित 5 विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित पालकमंत्री व अन्य मंत्र्याच्या उपस्थितीत नियुक्ती आदेश देण्यात आले. गृह विभागाच्या पोलीस शिपाई, पोलीस चालक व सशस्त्र पोलीस या पदांची १८ हजार ३३१ पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार.
ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद व क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी १० हजार ५०० पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार. राज्यसेवा २०२२ परीक्षेची १६१ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमानुसार होणारी ही शेवटची परीक्षा असल्याने उमेदवारांच्या विनंतीनुसार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यसेवा २०२२ यामध्ये ६२३ जागांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील सदस्याचे रिक्त पद भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदर नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व वर्ग-३ मधील लिपिकाची राज्यातील सर्व रिक्त पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यांना मिळाले नियुक्तीपत्र..
या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात परिक्षेच्या माध्यमातून आधीच निवड झालेल्या १७९६ उमेदवारांना आज नियुक्ती पत्रे देण्यात आली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या रोजगाराच्या मुद्यावर श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतलेल्या रोजगार मेळाव्यात अमरावतीतील नियोजन भवनातील १०८ जणांना, नागपूर येथील बचत भवन येथील १९१ जणांना, औरंगाबादेतील नियोजनातील २३८ जणांना,नाशिकमधील नियोजन भवनातील ४५५ जणांना, पुणे येथील नियोजन भवनातील ३१६ असे मिळून १३०८ जणांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आले. तर मुंबईतील म्हाडा कार्यालयातील ४२१ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
दरम्यान म्हाडातील रिक्त जागांसदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या काळात परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल प्रलंबित राहीला होता. दरम्यानच्या काळात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि पुढील प्रक्रिया खोळंबली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडून निवड करण्यात आलेल्या ६५ जणांनाही आज नियुक्ती पत्रे देण्यात आली. यातील निम्म्याहून अधिक जण हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ साली झालेल्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले, तर काही जण हे न्यायालयीन आदेशान्वये, तर काही जणांची निवड होऊनही त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेले नव्हते अशांना आज नियुक्ती पत्रे देण्यात आली असून अशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच परिवहन विभाग आणि उद्योग विभागात यापूर्वीच निवड झालेल्या प्रत्येकी एकासही नियुक्ती पत्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.