MaharshtraSTNewsUpdate : दिवाळीत एसटी बसने प्रवास करण्याचा विचार करताय ? मग आधी हे वाचा …

मुंबई : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त १४९४ जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान चालवण्यात येणार आहेत.
प्रवाशांची वाढती गर्दी आणि गरज पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद मधून ३६८, मुंबई २२८, नागपूर१९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ बस गाड्या सोडण्यात येणार आहे.
प्रवास दारात एसटीकडून हंगामी वाढ
दरम्यान महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात ५ ते ७५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ हंगामी असून दिवाळीच्या दरम्यान महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याच महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. २० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान, केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी एसटी प्रवास भाडेवाढ करण्यात येणार आहे. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला मात्र ही भाडेवाड लागू राहणार नाही. ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.
आरक्षण केलेल्या प्रवाशांना फरक द्यावा लागेल
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या गाड्यांचा प्रवास महागला
दादर ते स्वारगेट – साधी – सध्या २३५ प्रस्तावित – २६०
दादर ते स्वारगेट – शिवशाही सध्या ३५० प्रस्तावित- ३८५
मुंबई ते कोल्हापूर – साधी गाडी सध्या – ५६५, प्रस्तावित – ६२५ , शिवशाही- सध्या ८४०, प्रस्तावित – ९२५
मुंबई ते नाशिक- साधी गाडी सध्या ४००, प्रस्तावित ४४५, शिवशाही- ५९५, प्रस्तावित ६५५
मुंबई ते औरंगाबाद- साधी गाडी सध्या- ८६० प्रस्तावित – ९५०, शिवशाही – सध्या १२८० प्रस्तावित – १४१०