MaharashtraElectionUpdate : ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांचे शिक्षण किती आणि संपत्ती किती ?

मुंबई : अंधेरी पूर्वच्या पोट निवडणुकीतील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसारऋतुजा लटके या वाणिज्य विषयातील पदवीधर आहेत तर भाजपचे मुरजी पटेल यांचे इयत्ता ९ वी पर्यंत शिक्षण झाले असल्याची माहिती आहे.
ऋतुजा लटके यांची माहिती…
निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानासुर ऋतुजा लटके यांच्याकडे ४३ लाख ८९ हजार ५०४ रुपयांची जंगम मालमत्ता असून ऋतुजा लटके यांच्यासह मुलांच्या नावावर १२.३५ एकर जमीन आहे. ऋतुजा लटके यांच्यावर १५ लाख २९ हजाराच गृह कर्ज आहे. ऋतुजा लटके यांच्याकडे ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर त्यांच्या मुलाकडे पाच हजार रुपये आहेत. ऋतुजा लटके यांच्याकडे ५१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेत त्यांच्या नावे चिपळूणमधील एका घराचा उल्लेख आहे. पती स्वर्गीय रमेश लटकेंची मालमत्ता त्यांच्या नावावर झालेली नाही.. ती प्रक्रिया सुरू असल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे.
मुरजी पटेल यांची संपत्ती किती?
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुरजी पटेल यांची एकूण संपत्ती दहा कोटी ४१ लाख रुपयांची आहे. यापैकी पाच कोटी ४१ लाख रुपये मुरजी पटेल यांच्या नावावर आहे तर पाच कोटी रुपयांची संपत्ती आपत्यांच्या नावावर आहे. अंधेरीमध्ये मुरजी पटेल यांच्या नावावर तीन फ्लॅट आहेत. मुरजी पटेल यांच्याकडे गुजरातमधील कच्छ येथे ३० एकर जमीन आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कच्छ येथे ३० एकर जमीन आहे. या जमीन २०१३-१४ मध्ये ९८ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. याची सध्याची किंमत चार कोटी २५ लाख रुपये इतकी आहे. मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी रुपयांचे कर्ज आहे.
मुरजी पटेल यांच्यावर आरोप
दरम्यान पटेल यांच्या उमेदवारीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अक्षेप घेतला आहे. २०१७ पासून सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी असताना त्यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला? असा आक्षेप शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांची घेतला आहे. नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाकडून याबाबतचे पुरावे देखील देण्यात येणार असल्याचे संदीप नाईक यांनी म्हटले आहे.
मात्र, निवडणूक आयोगाने हे सर्व आक्षेप फेटाळले आहेत. यावेळी संपीद नाईक यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केलीय. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना भाजपने उमेदवारी का दिली? असा प्रश्न उपस्थित करत आपल्या दिवंगत आमदाराच्या पत्नी विरोधात अशा उमेदवाराला पाठिंबा कसा देताय? असा प्रश्न नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. आक्षेप असताना देखील मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते. शिवाय आक्षेप असूनही कारवाई होत नाही, त्यामुळे या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, असा इशारा संदीप नाईक यांनी दिला आहे.
ऋतुजा लटके यांच्यावरही आक्षेप
अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्याकडून लटके यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे . ऋतुजा लटके यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ईपीएफओ बॅलन्स अकाउंट नंबर आणि त्यामधील शिल्लक दाखवली नाही. त्यामुळे त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. परंतु, निवडणूक आयोगाने मिलिंद काबळे यांनी ही मागणी फेटाळली आहे.