ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : पक्ष आणि चिन्ह याबाबतचे दोन्हीही अधिकार निवडणूक आयोगाचे , सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, शिंदे गटाला मोठा दिलासा….

नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने निवडणूक आयोगाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिंदे गटाच्या अर्जावरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टाने पूर्ण केली असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीतून मिळणार आहे.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशा विनंतीचा ठाकरे गटाचा अर्जही सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे .
या निर्णयामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती नसेल, असे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने सुनावणीअंती दिलेल्या आदेशात केले स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून उद्धव ठाकरेंना आता निवडणूक आयोगाला त्यांनी विचारल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्रात उत्तर द्यावे लागेल, त्यानंतर सुनावणी होऊन निवडणूक आयोग त्यांच्या प्रक्रियेनुसार ठरवेल, की निवडणूक चिन्ह कोणाला आणि खरी शिवसेना कोणाची ? असा एकूण विषय आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व अधिकार निवडणूक आयोगाला दिले तर कसे होणार असा प्रश्न ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी विचारला परंतु न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या अधिकारावर शिक्कामोर्तब केले.