Maratha Reservation : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजात तीव्र संताप , हकालपट्टीची मागणी…

औरंगाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी , “राज्यात सत्तांतर होताच मराठा आरक्षण मागण्याची खाज सुटली का?” असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे . या वक्तव्याबाबत सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांची खाज उतरविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. तर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्याच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
शिंदे गटाचे आमदार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील मेळाव्यात बोलताना मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली का? आता ओबीसीमधून आरक्षण मागत आहेत, नंतर एससीमधून मागतील असे सावंत म्हणाले होते. सावंत यांचे वक्तव्य बेताल असल्याचे मराठा संघटनांनी म्हटले असून त्यांचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी : विनोद पाटील
‘मागील सरकारच्या काळात सावंत यांना मंत्री करण्यासाठी हेच मराठा कार्यकर्ते शिष्टमंडळ घेऊन भेटत होते. कोणत्या ताकदीच्या जोरावर सावंत यांनी एवढ्या खालच्या दर्जाचे वक्तव्य केलं आहे? सावंत यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना समज द्यावी, अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील.’, असा इशारा मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे. राज्यात ५० तरुणांनी बलिदान देऊन मराठा क्रांती मोर्चा उभा केला. सरकार कुणाचंही असलं तरी तरुणांची मागणी तीच असेल, असं पाटील म्हणाले.
हकालपट्टीची मागणी…
दरम्यान सावंत यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संताप व्यक्त केला आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे, असं अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी,’ अशी मागणीच नाना पटोले यांनी केली आहे.
वादग्रस्त वक्तव्याबाबत टीका करत असताना नाना पटोले यांनी सावंत यांना इशाराही दिला आहे. ‘तानाजी सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतंच वादग्रस्त विधान केलं होतं. या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती. तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहीत आहे,’ असं पटोले यांनी म्हटलं आहे.
संभाजी ब्रिगेडकडून तीव्र निषेध…
दरम्यान संभाजी ब्रिगेडनेही सावंत यांचा निषेध करताना म्हटले आहे की, ‘मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, ही संभाजी ब्रिगेडची ३० वर्षांपासूनची मागणी आहे. कारण ती संविधानिक मागणी आहे. तानाजी सावंत यांच्यासारख्या सरंजामी आणि प्रस्थापित मराठ्यांमुळे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही’, असे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
न्यायालयात टिकणारे आरक्षण ओबीसीतून असेल तर मराठा तरुण ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मागणार आहेत. तानाजी सावंत यांच्या वागण्याने मराठा समाजाची बदनामी झाली आहे. सरकारमधील वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली. तर तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागावी आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड सावंत यांची खाज उतरवल्याशिवाय आणि धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला आहे.