ShivsenaNewsUpdate : शिवाजी पार्कच्या मैदानासाठी शिंदे गटाचीही हस्तक्षेप याचिका , न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी …

मुंबई : मुंबई महानगर पालिकेने दादरच्या शिवाजी पार्कवर परवानगी मागणारे शिवसेना आणि शिंदे गटाचे अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयात या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन यावर उद्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे . शिवसेनेच्या याचिकेनंतर शिंदे गटाने शिवसेनेला न्यायालयातही शह देण्यासाठी आपली हस्तक्षेओ याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणात उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्याआधीच मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांना परवानगी नाकारली. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या याचिकेविरुद्ध न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवार म्हणजे उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे. सुधारित याचिकेची प्रत प्रतिवादींना द्यावी, असे निर्देश देत खंडपीठाने उद्या दुपारी सुनावणी करण्याचे ठरवले आहे.
न्यायालयात काय झाले ?
न्यायालयात शिंदे गटाच्या वतीने जनक द्वारकादास यांनी, शिवसेनेच्या वतीने ऍस्पि चिनॉय यांनी तर महापालिकेच्यावतीने मिलिंद साठ्ये यांनी आपापली बाजू मांडली. या दरम्यान शिंदे गटाच्यावतीने सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप अर्ज केल्याने त्यालाही आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परावानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली. यावेळी पालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, याचिकेत अर्जावर निर्णय देण्याची विनंती आहे. याबाबत आम्ही आमचा निर्णय दिला आहे, त्यामुळे याचिका सुनावणीयोग्य नाही, ती निरर्थक आहे. त्यावर शिवसेनेच्या वकिलांनी आक्षेप घेत म्हटले कि , याचिकेत विनंती नसून परवानगी देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती आहे. त्यामुळे याचिका सुनावणीयोग्य आहे. आम्ही त्याबद्दलचा युक्तिवाद करु दरम्यान न्यायालयाने ही विनंती मान्य करत याप्रकरणात उद्या सुनावणी ठेवली आहे.