ShivsenaNewsUpdate : शिवसेनेचा ताबा आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह मिळावे म्हणून शिंदे गट पुन्हा निवडणूक आयोगाकडे …

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन तृतियांशहून अधिक आमदार फोडून स्वतंत्र गट निर्माण करून भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पद मिळविल्यानंतर त्यांच्यासह बंडखोरी करणाऱ्या सर्व आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे . याबाबतच्या सर्व याचिकांची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपीठाची स्थापना केल्यानंतर अंतिम निकाल प्रलंबित आहे. या परिस्थितीत मूळ शिवसेना आपल्याकडेच असल्याचा दावा बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला मनाई केलेली असली तरी याचा निकाल आयोगाने तातडीने द्यावायासाठी बंडखोर गटाचे नेते आग्रही आहेत.
दरम्यान ओरिजनल शिवसेना कोणाची ? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार असल्याचे वृत्त आहे. मीडिया वृत्तानुसार एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येणार आहेत. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात वाद सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर जाऊन एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचं सांगणार असल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेतील सर्वाधिक ४० आमदार आणि सर्वाधिक खासदार आपल्यासोबत आहेत असा दावा शिंदे यांनी आधीच निवडणूक आयोगाकडे केलेला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेना कुणाची? आणि पक्षाचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.