Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeUpdate : संतापजनक : मोटारसायकलला स्पर्श केला म्हणून मागास विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण …

Spread the love

लखनौ : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील जातीय मानसिकता संपायला तयार नाही . विशेष म्हणजे नवी पिढी घडविण्याची जबादारी ज्यांच्यावर आहे अशा शिक्षकांकडूनच हे प्रकार घडत आहेत हे लज्जास्पद आहे. राजस्थानातील माठाला स्पर्श केल्यामुळे शिक्षकाने केलेल्या मारहाणीत एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशात एका ११ वर्षीय मागास विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी आणि मुलाने त्याच्या मोटारसायकलला स्पर्श केल्यानंतर त्याला वर्गात बंद केल्याप्रकरणी बलिया येथील सरकारी शाळेतील शिक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. मात्र या शिक्षकाला अद्याप अटक झालेली नाही, असेही ते म्हणाले.


आरोपी शिक्षक तडकाफडकी निलंबित

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर  संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. जिल्हा मूलभूत शिक्षणाधिकारी मणिराम सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असून, तपासणी अहवालात प्रथमदर्शनी शिक्षक दोषी आढळला आहे. सिंह म्हणाले की, आरोपी शिक्षक कृष्ण मोहन शर्माला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी शनिवारी या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यानंतर शनिवारी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आरोपी शिक्षकाला निलंबित केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नागरा पोलिस स्टेशन हद्दीतील भीमपुरा क्रमांक २ गावात राहणारा विवेक हा शिक्षण क्षेत्रातील राणौपूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयात सहाव्या वर्गात शिकतो. विद्यार्थ्याचे वडील गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करतात.

विद्यार्थ्याच्या आईच्या म्हणण्यानुसार…

विद्यार्थ्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, सहावीत शिकणारा तिचा मुलगा शुक्रवारी शाळेतून उशिरा घरी आला. “जेव्हा मी त्याला विचारले की तो घरी उशीरा का आला, तेव्हा त्याने मला शाळेतील घटनेबद्दल सांगितले. मध्यंतरादरम्यान त्याने एका शिक्षकाच्या मोटारसायकलला स्पर्श केल्याचे त्याने सांगितले. त्यावर चिडलेल्या शिक्षकाने त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. नंतर शिक्षकाने माझ्या मुलाला एका रिकाम्या खोलीत बंद केले. शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी उशिरा माझ्या मुलाला घरी परतण्याची परवानगी दिली तसेच माझ्या मुलाला मारहाण करताना शिक्षकानेही जातीवाचक टिप्पणीही केली.

आईने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तिने शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन केला आणि “मी त्याला विचारले की, त्याच्या उपस्थितीत माझ्या मुलाचा छळ आणि मारहाण का करण्यात आली? जेव्हा त्याने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही , तेव्हा मी त्यांना पोलिसात एफआयआर नोंदवण्यास सांगितले. मुख्याध्यापकांनी मला हे प्रकरण पुढे न वाढवण्याची विनंती केली आणि त्यावर तोडगा काढण्यास सांगितले, परंतु आपण पोलिसात याबाबत तक्रार केल्याचे मुलाच्या आईने सांगितले.

लोखंडी पाईप आणि झाडूने मारले…

विद्यार्थी विवेकने शनिवारी पत्रकारांना सांगितले की, शुक्रवारी शाळेत जेवणाच्या सुटीदरम्यान त्याचा हात चुकून शाळेतील शिक्षक कृष्ण मोहन शर्मा यांच्या मोटारसायकलला लागला. त्याने सांगितले की, यानंतर शिक्षक त्याला शाळेतील एका खोलीत घेऊन गेला आणि तेथे त्याची कॉलर धरून खोलीत कोंडून ठेवले. लोखंडी पाईप आणि झाडूने वार केले आणि मानही दाबली, असा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करून त्याला वाचवल्याचे विवेकने सांगितले.


या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी शाळेत एकच गोंधळ घातला. नगारा पोलिस ठाण्याचे प्रभारी देवेंद्र नाथ दुबे आणि गटशिक्षण अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना समजावून सांगितल्यानंतर गोंधळ संपवला. पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र नाथ दुबे यांनी सांगितले की, दलित विद्यार्थ्याची आई कौशिला हिच्या तक्रारीवरून शिक्षक कृष्ण मोहन शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!