Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : बहुमतात असलेली सरकारे पडणे लोकशाहीसाठी घातक : अजित पवार

Spread the love

मुंबई : बहुमतात असलेली विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचे प्रकार लोकशाहीसाठी घातक असून चुकीच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या या सरकारला मान्यता मिळाली तर देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही, अशी प्रतिक्रिया  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणारे प्रकरण सर्वोच न्यायालयाच्या घटनापीठापुढे जाईल, तेथे काय होते ते बघू यात असेही ते म्हणाले. 


दरम्यान १४५ आमदारांचा पाठिंबा असेल तो पर्यंत हे सरकार टिकेल, नाही तर पडेल, असे भाकित करून ते पुढे म्हणाले कि , पश्चिम बंगाल व राज्यस्थानमध्येही त्यांनी प्रयत्न केले परंतु तेथे त्यांना यश आले नाही. बिहारमध्ये तर नितीशकुमार यांनी चांगलाच झटका दिला. राज्यातील सत्तांतर प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे जाईल, काय होते, बघू, परंतु या सरकारला मान्यता मिळाली तर देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची गुरुवारी सांगता झाली. त्यानंतर विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी, केवळ सहा दिवस पार पडेल्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी या वेळी पहिल्यांदा एकही क्षण वाया जाऊ दिला नाही, कामकाजात जास्तीत जास्त सहभागी होऊन जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना अधिकची मदत द्यावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, या आम्ही केलेल्या मागण्यांची सरकारने दखल घेतली नाही, या प्रश्नावर सरकार संवेदनशील नाही, अशी टीका त्यांनी केली.

या वेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजीमंत्री राजेश टोपे आदी उपस्थित होते. सभागृहात कोणतीही गडबड करायची नाही, परंतु बाहेर घोषणा द्यायच्या, अशी आम्ही रणनीतीच ठरविली होती. त्यानुसार काम केले. एकही विधेयक चर्चेशिवाय मंजूर करू दिले नाही. परंतु काल बुधवारी बाहेर गोंधळ झाला. मात्र प्रकरण पुढे जाऊ दिले नाही, असेही ते म्हणाले. अर्थात ‘अरे ला का रे’ ने उत्तर द्या, अशी चिथावणीखोर भाषा मुख्यमंत्र्यांनी केली, त्याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!