MaharashtraPoliticalUpdate : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज एकत्रित बैठक

मुंबई : राज्यातील सत्तांतराचा पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीची आज सायंकाळी बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसह माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही माहिती दिली.
याविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले की, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी या सगळ्यांसह आमचं ठरलं आहे की, आज एकत्रित बैठक घेऊया. कारण अधिवेशन पहिल्या आठवड्यात दोन दिवस झालं. दुसरा आठवडा सुरु झाला आहे. विरोधी पक्ष एकत्रितपणे सत्ताधारी पक्षाच्या समोर विरोधक म्हणून जात आहे. आम्ही आमची एकी टिकवण्याचा प्रयत्न करतोय, एकी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अशावेळी उद्धव ठाकरेंना विनंती केल्यानंतर मी येतो संध्याकाळी असं आश्वासन दिलं. तेही त्यांच्या परीने मार्गदर्शन करतील आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही जे राहिले आहोत, त्यांच्यात एक चांगला उत्साह निर्माण होईल, एक चांगला मेसेज जाईल.”
विधानभवानात सायंकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे देखील या बैठकीला येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधानमंडळात येतील.