MaharashtraNewsUpdate : श्रीवर्धन, हरिहरेश्वर येथे मिळालेल्या संशयास्पद बोटी कुणाच्या ? मिळाले उत्तर …

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळून आली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या असून काही कागदपत्रेही सापडली आहेत. तसेच हरिहरेश्वर येथेही एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. दरम्यान, हि माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली असून या बोटींबाबत अधिक तपास केला जात आहे. या बोटींविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.
दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट ओमानची असून तिथल्या खाजगी सुरक्षेसाठी वापरली जात होती. सागरी दुर्घटनेनंतर वाहून जाताना ही बोट महाराष्ट्राच्या समुद्रात आली आहे. झडती दरम्यान बोटीतून एक लाईफ बोटही सापडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ओमान ते हरिहरेश्वर हे अंतर ९८५ नॉटिकल मैल इतकं आहे. या बोटीत २ इंडोनेशीयन प्रवासी होते. मात्र ज्यावेळी हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर बोट सापडली, त्यावेळी बोटीत कोणीही नव्हतं. त्यामुळे दोन इंडोनेशियन प्रवासी कुठे गेले असा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगडच्या हरिहरेश्वर येथील स्थानिकांना या बोटीत शस्त्रं सापडली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं बोट किनाऱ्यावर आणली. दरम्यान ही बोट ओमानची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Weapons also found on the boat: Official sources on the suspicious boat found at Harihareshwar Beach in Raigad. https://t.co/L8e9Y8q6al
— ANI (@ANI) August 18, 2022
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती
याबाबत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर म्हणाले की, श्रीवर्धन समुद्रकिनारी २ संशयास्पद बोटी आढळल्या आहेत. या बोटींमध्ये ३ एके ४७ आणि २२५ राऊंड्स, कॉन्फरन्स टेबल, कॅम्प्युटर आढळले आहेत. काही ग्रामस्थांनी बोट काढण्याचा प्रयत्न केला. काही एके-४७ बंदुका आढळून आल्या आहेत. नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन असं बोटीवर लोगो आहे. पोलीस तपास करत आहेत. संबंधित कंपनीची ही स्पीड बोट असावी अशी शक्यता आहे.त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयास्पद गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.
Maharashtra ATS team has moved for Raigad, where a suspicious boat with weapons was found at Harihareshwar Beach https://t.co/qIRnaFd4aA
— ANI (@ANI) August 18, 2022
आमदार अनिकेत तटकरे यांची विधानपरिषदेत माहिती
या संदर्भात स्थानिक आमदार अनिकेत तटकरे यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ”आज सकाळी संशयास्पद बोट सापडली असून या बोटीत तीन एके ४७ कागदपत्रे आणि २०० ते २२५ जिवंत काडतुसे सापडली असल्याची माहिती आहे. ही घटना अतिशय गंभीर असून सरकारने याची चौकशी करावी”, असे ते म्हणाले. तर आदिती तटकरे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ”राजयगडच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयित बोट आढळून आली असून यात काही हत्यारं सापडली आहे. यासंदर्भात तत्काळ एक चौकशी समिती नेमून याची चौकशी करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचा आदेश : फडणवीस
हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर वाढलेल्या संशयास्पद बोटींबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री म्हणाले कि , रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये समुद्र किनाऱ्यावर एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली, या बोटीत शस्त्रास्त्रं सापडली आहेत. ती बोट नेपच्यून मॅरिटाईम कंपनीची आहे, जी लेरिहान नावाच्या ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे, जेम्स हार्बर्ट या बोटीचे कप्तान होते, मस्कतहून युरोपकडे जात होती, २६ जून रोजी सकाळी १० वाजात इंजिन निकामी झालं, खलाशांनी मदतीसाठी कॉल केला, त्यानंतर कोरियन युद्धनौकेने त्यांची सुटका करुन त्यांना ओमानच्या हवाली केले.
समुद्र खवळला असल्याने ही नौका टोईंग करता आली नाही, अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागली, तटरक्षक दलाने माहिती दिली, स्थानिक पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक दोघे मिळून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस घटकांना सतर्कतेचा आदेश देण्यात देण्यात आले आहेत. तटरक्षक दल आणि यंत्रणांशी संपर्कात आहे
दरम्यान राज्यात पोलिसांनी बंदोबस्तात कुठेही कमी राहू नये यादृष्टीने नाकाबंदीचे आदेश दिले आहेत, सणांचे दिवस असल्यामुळे घटना घडणार नाही याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, केंद्रीय यंत्रणा संपर्कात आहे, केंद्रीय यंत्रणांनी माहितीला दुजोरा दिला आहे.