MaharashtraMonsoonAssemblyUpdate : दुसऱ्या दिवशीही शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी ….

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी चालूच ठेवली. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खोके आणि ओकेवरून टोलेबाजी केल्यानंतर आज , गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी, अशा घोषणांनी विधिमंडळ परिसर विरोधी आमदारांना दणाणून सोडला.
दरम्यान माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टिका करताना सातत्याने गद्दार हा शब्द वापरला आहे. गद्दार, विश्वासघातकी आणि पाठित खंजीर खुपसला असे म्हणत आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर टीका करीत आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या विधानावर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पलटवार केला आहे. त्यानंतर, आता मंत्री उदय सामंत यांनीही आदित्य ठाकरेंना गद्दार या शब्दावरुन उत्तर दिले आहे.
उदय सामंत यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर
‘गद्दार या शब्दाची व्याख्या मला कळत नाही. त्यामुळे गद्दार या शब्दाची व्याख्या महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाली पाहिजे. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगताहेत की, आमची नैसर्गिक आघाडी नव्हती. ही आघाडी कशी झाली, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस जर एकत्र लढली असती तर काही म्हणण्याचे कारण नव्हते. पण, शिवसेना आणि भाजप एकत्र लढली. मतदारांनी आम्हाला संधी दिली. त्यानंतर भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे ही गद्दारी होत नाही का? असा सवाल सामंत यांनी सभागृहात उपस्थितीत केला.
तुम्हीच मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला – म्हात्रे
आदित्यजी, गेल्या अनेक दिवसांपासून पाठित खंजीर खुपसणं, गद्दारी, विश्वासघात हे शब्द आम्ही आपल्या तोंडून ऐकत आहोत. खरं तर या विषयावरबोलायचं नव्हत, बोलणारही नव्हतो. पण, आज आपण बोलायला भाग पाडत आहात. या शब्दांची व्याख्या आपण समजून घेतली तर बरे होईल. आज आपण आमदार झालात, त्यावेळी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून मते मागितली. त्यामुळे, आपल्या आमदार होण्यामागे कुठेतरी भाजपचीही मते आहेत, हे विसरु नये. आपण महाविकास आघाडी स्थापन करुन सत्तेत आला. त्यामुळे, कोणी विश्वासघात केला असेल तर तो आपण केला आहे . कोणी मतदारांच्या पाठित खंजीर खुपसला असेल तर तो आपण खुपसला आहे. जर कोणी गद्दारी केली असेल तर ती माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आपण केली आहे , असे म्हणत शितल म्हात्रे यांनीही आदित्य ठाकरेंवर घणाघात केला आहे.