MaharashtraMonsoonAssemblyUpdate : “मंत्री तुम्ही तुमच्या घरी” गुलाबराव पाटील यांच्यावर भडकल्या निलम गोऱ्हे

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधी मंडळाच्या दोन्हीही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधान परिषदेत आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर उपसभापती निलम गोऱ्हे चांगल्याच भडकल्या होत्या. “मंत्री तुम्ही तुमच्या घरी”, अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावले इतकेच नव्हे तर सभागृहात बोलण्याच्या आक्रमक पद्धतीवरुनही त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना सक्त ताकीद दिली.
शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जुंपली. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना खाली बसण्यासाठी वारंवार निर्देश दिले तरी ते खाली बसले नाहीत. छातीवर हात बडवून काय बोलता?, अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी गुलाबरावांना सुनावलं.
सभागृहात नेमकं काय घडलं?
त्याचे झाले असे कि , शिक्षकांच्या बाबतीतील एका प्रश्नावरुन गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गदारोळादरम्यान मंत्री गुलाबराव यांना वारंवार खाली बसण्याची विनंती करत होत्या. “गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? परत परत सभापतींना सांगावं लागतंय. चौकात आहात का तुम्ही?”, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर गुलाबराव पाटील यांनी “मी मंत्री आहे”, असे म्हटले. यावरुन निलम गोऱ्हे आणखी भडकल्या आणि “मंत्री काय? मंत्री तुम्ही तुमच्या घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा”, असे सुनावले.
तुम्ही ताबडतोब खाली बसा आणि तुमचं निवेदन थांबवा…
तुम्ही ताबडतोब खाली बसा आणि तुमचं निवेदन थांबवा, मंत्रीमहोदय ही पद्धत नाहीये, तुमच्या विभागाची चर्चा होत नाहीये, मी तुम्हाला ताकीद देते, केसरकरांच्या शिक्षण विभागाचा प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही कॅबिनेटमध्ये काय करत होता ? त्याचा आता काय संबंध ? आणि काय छातीवर हात आपटून वगैरे बोलताय, खाली बसा, ही पद्धत नाहीये वागायची…
त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, शिक्षणमंत्री एका प्रश्नाला उत्तर देत होते. दरम्यान विरोधीपक्ष नेते म्हणाले की, एक मंत्री दादागिरी करत होता, मी त्यावेळी मंत्रिमंडळातील सभासद होतो, अनिल परबांना विचारा ते मंत्री होते, एसटीचा पगार देऊ शकले नाही, तेव्हा निलम गोऱ्हेंनी त्यांना थांबवलं आणि त्या काहीतरी म्हणाल्या, तेव्हा गुलाबराव पाटील म्हणाले, सभापती महोदया मध्ये बोलू नका. हे ऐकताच सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, परत हात वर करतात की मला बोलायचं आहे आणि माझ्याकडे बघून हातवारे करतात, तुमचं म्हणणं काय आहे रेकॉर्डवर घ्या, तुम्ही कोणाला इशारा करताय ?