MaharashtraMonsoonAssemblyUpdate : मंत्री सावंत यांचे उत्तर आणि विरोधकांचा हंगामा

मुंबई : गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस असल्याच्या तानाजी सावंत यांच्या उत्तरामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारात मोठी खडाजंगी झाली. बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील एका महिलेचा अवैध गर्भपातामुळे झालेला मृत्यू या प्रश्नावर सावंत उत्तर देत होते.
गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा ‘फेमस’ आहे, असे उत्तर तानाजी सावंत यांनी दिले, पण ‘फेमस’ म्हणजे ‘लोकप्रिय’ या शब्दावर ठाकरे गटातले आमदार सुनिल प्रभू यांनी तीव्र आक्षेप घेतला, यानंतर सावंतांच्या मदतीला शंभूराज देसाईही उठले, अजित दादांनी यात हस्तक्षेप करत ‘फेमस’ हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा असून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचना केली, या सूचनेचा विचार केला जाईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले.
विशेष म्हणजे नियमित कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासाने सुरुवात, पटलावर नसलेला प्रश्न अजित दादांनी विचारल्याने तानाजी सावंतांची तारांबळ उडाली. पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या किती जागा रिक्त आहेत आणि मंजूर पदं किती आहेत ? हा प्रश्न अजित पवारांनी विचारल्यावर उत्तर देताना तानाजी सावंत यांनी संपूर्ण राज्याची आकडेवारी सादर केली, मात्र पालघर जिल्ह्यातील माहिती उपलब्ध नव्हती, पालघरची माहिती अर्ध्या तासात देतो असे तानाजी सावंत म्हणाले, तेव्हा विरोधी बाकावर हशा पिकला. दरम्यान अर्ध्या तासात माहिती मिळणे शक्य दिसत नाही असे म्हणत विधानसभा अध्यक्षांनी सोमवारी माहिती द्या असे तानाजी सावंतांना कळवले.
पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित
आमदार नमिता मुंदडा यांनी आज लक्षवेधी सूचना माध्यमातून अंबाजोगाईतील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असून या प्रकरणी पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केल्याची घोषणा केली तर जिल्हा पोलीस उपाधीक्षक जयभाये यांची कार्यकारी पदावर बदली करण्यात येत असल्याचेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात सांगितले.