Maharashtra Monsoon Assembly Session LIVE : जोरदार घोषणाबाजी करीत विरोधकांनी गाजवला अधिवेशनाचा पहिला दिवस …

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिंदे – फडणवीस सरकारचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सरकार यांच्यात मोठी खडाजंगी होणार असल्याचे संकेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारला खासकरून शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. १७ ते २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
या दरम्यान तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळं अधिवेशनाचं प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचं असणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘ईडी सरकार हाय हाय’ , ५० खोके एकदम ओके…
या अधिवेशनाच्या प्रारंभी राज्य सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी आमदारांनी, ‘ईडी सरकार हाय हाय’ , ५० खोके एकदम ओके, अशी जोरदार घोषणाबाजी करीत अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत करण्याबरोबरच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली.
यावेळी शिंदे गटाचे आमदार विधानभवनात येत असताना शिवसेनेच्या उमेदवारांनी ‘आले रे आले, गद्दार आले’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाबाहेर विरोधकांनी चांगलाच गोंधळ मांडला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांकडून ही घोषणाबाजी सुरू होती.
आदित्य ठाकरे यांचा बंडखोर आमदारांवर हल्ला बोल…
दरम्यान आदित्य ठाकरे हेदेखील विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी म्हटले की, “आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार असल्याचा हल्लाबोल आदित्य यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपावरही टीका केली. जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झाले आहेत. काहींना आधीच्या तुलनेत कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. जे त्यांचे निष्ठावंत होते, जो पहिला गट गेला त्यांना काहीच मिळालेलं नाही. म्हणजे या गद्दारांनी पुन्हा एकदा दाखवलं आहे की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. ज्या लोकांची निष्ठा एका माणसासोबत राहिली नाही, एका पक्षासोबत राहिली नाही, ते अशा लोकांसोबत कसे राहतील त्यांना तिथे जाऊन काहीच मिळालेलं नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांची जोरदार घोषणाबाजी…
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी , ‘आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ‘ईडी सरकार हाय हाय, शेतकऱ्याला मदत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, संजय शिरसाट यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सुधीरभाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आशिष शेलार यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सभागृहाबाहेरच सत्ताधारी-विरोधक भिडले…
यावेळी विरोधक आणि आदित्य यांच्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले . ते म्हणाले कि , “आदित्य ठाकरेंची भाषा अशोभनीय आहे. बेईमानी आणि लाचारी या शब्दांचा अर्थ समजायचा असेल तर मतं घ्यायची मोदीजींचा फोटो दाखवून आणि गोदीत जाऊन बसायचं सोनिया गांधी यांच्या, हे बेईमानी नाही का? लाचार या शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेची गोड फळं चाखण्यासाठी शरद पवारांच्या गोदीत बसायचं, याचा लाचारी म्हणत नाही का? आदित्यजी जरा अभ्यास करा, अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे वय आहे आणि मगच भाष्य करा.”
शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या व्हीप वरून राजकारण…
विधिमंडळाच्या सभागृहात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. शिवसेनेचा पक्ष प्रतोद नेमका कोण याचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान या अधिवेशनात सरकारच्या वतीने अनेक विधेयकं मांडण्यात येणार असल्याने कदाचित मतदानाची वेळ येऊ शकते. त्यामुळेच ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला आहे. इतर सर्व पक्षांनीही त्यांच्या आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे.
विशेष म्हणजे राज्यातील सत्तासंघर्षावरच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढची सुनावणी ही २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी शिंदे गटाने शिवसेना आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला असून तो वादही आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. सर्वोच्च न्यायालयात एकूण सहा याचिका दाखल असून यामध्ये पक्ष प्रतोद पदाचा वादाचाही विषय आहे.
दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे गटाच्या वतीनेही शिवसेनेच्या विधानसभेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. अधिवेशनाच्या संपूर्ण काळात दररोज कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचे या पक्षादेशात म्हटले आहे. त्यामुळे अधिकृत व्हीप कुणाचा यावरून सभागृहात चांगलेच राजकारण तापणार असल्याचे चित्र आहे.
आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि तो संमत झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , द्रौपदी मुर्मूंची निवड अभिमानास्पद असून ‘मुर्मूंच्या निवडीने देशाची मान उंचावली उंचावली आहे. राष्ट्रपती मुर्मूंची नाळ मातीशी जोडलेली असून राष्ट्रपती मुर्मूंचे जीवन प्रेरणादायी आहे. सामान्य महिला देशाच्या सर्वोच्च स्थानी असल्याने मुर्मूंचा कार्यकाळ अभिमानास्पद ठरेल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार , झिरवळ यांनीही मुर्मू यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तवावर आपले विचार मांडले.
नाना पटोले यांची मागणी आणि फडणवीसांचे उत्तर
दरम्यान विदर्भातले भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्हे पाण्याखाली आहेत, लोकांची घरं पडलीत, यापेक्षा महत्त्वाचं काम असूच शकत नाही, राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावापूर्वी नाना पटोलेंची वेळेवर मदतीची मागणी केली त्यावर अतिवृष्टीची माहिती घेतली जातेय, लवकरात लवकर माहितीबाबत निवेदन केलं जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी ऊत्तर दिले.
सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या विध्येयकावरून विरोधकांचा गोंधळ
दरम्यान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (सुधारणा) विधेयक (क्रमांक १६), महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक (क्रमांक १७ – याच विधेयकाला गिरीश महाजन विधेयक क्रमांक १८ असे चुकून बोलले, त्यानंतर विरोधकांनी यावर आक्षेप घेतला), महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक २०२२ (क्रमांक १८), हे तीन विधेयक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मांडले.
विधेयक मांडताना गिरीश महाजन हे पहिल्यांदा सभागृहाच्या बाहेर होते, दुसऱ्या वेळी एका फाईलमध्ये त्यांचं लक्ष होतं, त्यामुळे यांचं लक्षच नाही असं म्हणत अजित दादांनी नाराजी व्यक्त केली, अजित दादांनी या चुकीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यात येईल अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिली. त्यानंतर यावेळी थेट सरपंच आणि नगराध्यक्ष यांची जनतेतून थेट निवड करण्यासाठीच्या विधेयकाला मान्यता देण्यात आली.
शोक प्रस्तावानंतर विधानसभेचे कामकाज स्थगित
काही काळ विधेयकावर चर्चा झाल्यांनतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात शोक प्रस्ताव मांडले आणि या कामकाजानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेंकर यांनी सभागृहाची बैठक स्थगित होत असल्याचे सांगितले. आता उद्या गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विधानसभेची विशेष बैठक सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान विधानसभेनंतर विधान परिषदेतही नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.