BeedAccidentNewsUpdate : ट्रक- कारच्या भीषण अपघातात सहा ठार

पाटोदा : येथील पाटोदा- मांजरसुबा महामार्गावर बामदळे वस्तीवर १४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता कार व ट्रकच्या भीषण अपघात झाला. यात कारमधील सहा जण जागीच ठार झाले. लग्नसोहळ्यासाठी हे कुटुंब पुण्याला निघाले होते. मृतांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.
जीवाचीवाडी (ता. केज) येथील रामहरी चिंतामण कुटे यांचे कुटुंबीय लग्नसोहळ्यासाठी पुण्याला जात होते. बामदळे वस्तीवर ट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. यात सहा जण ठार झाले आहे.ट्रकच्या खाली कार घुसली होती ती काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मृतांत दोन लहानग्यांचा समावेश आहे.
घटनास्थळी पाटोदा ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार व सहकाऱ्यांनी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. या घटनेने लग्नसोहळा व जीवाचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.