Ramdas Athawale News Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ५० आमदारांसह आपल्या गटात येण्याची खुली ऑफर

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला रिपब्लिकन गटात विलीन करण्याची ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आपल्या आरपीआय पक्षात आला, तर मी टेबलावर उभे राहून त्यांचे स्वागत करेल, असे आठवले यांनी म्हटले आहे.
देशातील चालू घडामोडींवर भाष्य करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी राज्य तसेच आपली मते मांडली. आठवले म्हणाले, मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० आमदार, शेकडो नगरसेवक व शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर टेबलावर उभं राहून मी त्यांचे स्वागत करेन.
दरम्यान शिवसेना कुणाची ?त्यावर बोलताना आठवले म्हणाले कि , शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंची आहे तर बरी शिवसेना ठाकरेंची आहे.
आरपीआयला एक मंत्रिपद
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असा दावा आठवले यांनी केला. तसेच, मंत्रिमंडळात आरपीआयला एक मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
त्यांचे नाव अधीर आहे, मात्र डोकं बधिर …
काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती उल्लेख करण्याऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. त्यावरुन दिल्लीचे राजकारणही चांगलेच तापले आहे. यावर आठवले यांनी शेलक्या शब्दांथ अधीर रंजन चौधरी यांच्यावर टीका केली. आठवले म्हणाले, त्यांचे नाव अधीर आहे, मात्र डोकं बधिर आहे.