ShivsenaNewsUpdate : चर्चेतली बातमी : जाणून घ्या कोण आहेत शिंदे गटात जाणारे चर्चेतले १२ खासदार …

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे यांनी आता आपला मोर्चा शिवसेनेतील खासदारांकडे वळवला आहे. शिंदे आणि आमदारांच्या या बंडखोरीनंतर त्याचे लोण आता नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांपर्यंत खाली आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतून शिंदे गटाला जाऊन मिळणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना थांबविण्याचा कोणताही ठोस उपाय उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. त्यामुळे कायद्याच्या लढाईवरच त्यांना तूर्त अवलंबून राहावे लागणार आहे.
दरम्यान आमदारांच्या बंडखोरीपाठोपाठ शिवसेनेच्या खासदारांच्या संभाव्य बंडखोरीबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , ही बंडखोरी होणार याची कल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होती, पण मला यावर फार गांभीर्याने प्रतिक्रिया द्यायची नाही. हे होणार होतं याची कल्पना उद्धव ठाकरे यांना होती. प्रत्येक खासदारावर दबाव टाकण्यात आला. वेगवेगळ्या पद्धतीची आमिषे दाखवण्यात आली. वेगवेगळ्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या द्यायच्या आणि आपल्याकडे खेचून घ्यायचे , अशा प्रकारची कपटनीती गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांसोबत खेळली जात होती. दुर्दैवाने त्याला ते बळी पडले आहेत.
बंडखोरांच्या यादीत चर्चेत असलेले खासदार..
शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे जे १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे त्यामध्ये १) भावना गवळी, २) राहुल शेवाळे, ३) हेमंत गोडसे, ४) धैर्यशील माने, ५) संजय मांडलिक, ६) राजेंद्र गावित, ७) श्रीरंग बारणे, ८) श्रीकांत शिंदे, ९) सदाशिव लोखंडे, १०) प्रताप जाधव, ११) कृपाल तुमाणे, १२) हेमंत पाटील यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
दरम्यान शिंदे गटाने तयार केलेल्या नव्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले कि “शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला बरखास्त करण्याचा अधिकार या गद्दारांना नाही. त्यांनी शिवसेनेची कार्यकारिणी बघावी, तपासावी आणि मगच याबाबतचा निर्णय घ्यावा. २० जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे आमचे लक्ष आहे,” असे राऊत म्हणाले.