MaharashtraNewsUpdate : राज्यपालांचा शिंदे सरकारला दिलासा, अधिवेशनाची तारीख वाढली

मुंबई : राज्याचे नवे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता . मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले आहे. दरम्यान, अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून , विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचेही नाव चर्चेत आहे. आता यापैकी कुणाची निवड विधानसभा अध्यक्षपदी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान राजभवनावरील शपथविधी आटोपून मध्यरात्री गोव्याकडे निघालेले मुख्यमंत्री पहाटे गोव्यात पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांनी बहुमत चाचणी केवळ सोपस्कार असल्याचे म्हटले असून १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा केला आहे. दोनापॉल येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाचे बंडखोर आमदार आहेत. शिंदे हे आता त्यांना सोबत घेऊनच मुंबईला जाणार आहेत. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी शिंदे यांची हॉटेलवर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.