AurangabadCrimeUpdate : नशेखोरीतून शहरात आणखी एक खून , आरोपी अटकेत

औरंगाबाद : नशेखोरीतून होणारे वाद आणि त्याचे पर्यवसान खुनात होण्याचे सत्र शहरात सुरूच असून, त्यात आणखी एका खुनाची भर पडली आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या दलालवाडी भागात एका ३२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. रिझवान उलहक इम्रान उलहक (३२) असे या तरुणाचे नाव आहे. आरोपीचे नाव वसीम उर्फ हमला रमजानी कुरेशी (२८, रा. दलालवाडी) असे असून त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लेखाना भागात राहणारा रिझवान याचे नेहमी दलालवाडी परिसरात राहणाऱ्या मित्रांकडे येणे-जाणे होते. येथे आल्यानंतर उशिरापर्यंत मित्रांसोबत पार्टी करणे आणि नंतरच घरी परतणे असे तो करायचा. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास येथे आल्यानंतर तो वसीमसोबत दलालवाडी भागातील एका रिकाम्या प्लॉटवर दारू पित बसला होता. काही वेळातच दोघांमध्ये जुन्या कारणावरून वाद सुरु झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यानंतर वसीमने त्याच्याकडील चाकू काढून रिझवान याच्यावर सपासप वार केले. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि अति रक्तस्राव झाल्यामुळे काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके व अन्य सहकारी घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरा या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खून करून फरार झालेला आरोपी वसीम कुरेशी याला ताब्यात घेऊन अटक केली.