Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : काय आहे प्रकरण ? भाजप महिला प्रवक्त्याविरुद्ध मुंबई , पुणे आणि हैदराबादेत गुन्हे दाखल , कानपुरात दंगल, योगींचें कडक धोरण

Spread the love

कानपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर असतानाच, उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये, प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या प्रवक्त्याने नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बाजार बंद ठेवण्याच्या आवाहनावरून शुक्रवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. एका गटाने पुकारलेल्या बंदला दुसऱ्या गटाने विरोध केला, त्यानंतर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी आणि पुढील हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगेखोरांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले असून आतापर्यंत पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले आहे. 


भाजपच्या एका महिला प्रवक्त्याने ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर इंग्रजी टीव्ही चॅनेलवर झालेल्या चर्चेदरम्यान पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात कथितपणे आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून हे प्रकरण घडले आहे . या प्रकरणात भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात हैद्राबाद आणि पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा

या पार्श्वभूमीवर असलेल्या दोन गटातील दंगल प्रकरणी कानपूरचे पोलिस आयुक्त विजय सिंह मीना यांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि चकमकीप्रकरणी आतापर्यंत या हिंसाचारानंतर आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओच्या आधारे इतरांचा शोध सुरू आहे. संबंधित भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला असून 12 कंपन्या आणि एक प्लाटून पीएसी पाठवण्यात आले आहे. मात्र बंदुकीच्या गोळ्या ऐकू आल्याच्या आणि चकमकीदरम्यान पेट्रोल बॉम्बचाही वापर झाल्याच्या अफवांचे त्यांनी खंडन केले. आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त म्हणाले, “50 ते 100 च्या संख्येत काही तरुण अचानक रस्त्यावर आले आणि घोषणाबाजी करू लागले. दुसऱ्या गटाने विरोध केला आणि त्यानंतर दगडफेक सुरू झाली. घटनास्थळी सुमारे आठ ते दहा पोलिस उपस्थित होते, त्यांनी हस्तक्षेप करून  प्रयत्न पूर्वक परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आणली.”

“यानंतर तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली आणि माझ्यासह वरिष्ठ अधिकारी 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. जे हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा पाठलाग करण्यात आला. आम्ही सुमारे 15-20 जणांना ताब्यात घेतले आहे,” आम्ही त्यांची चौकशी करत आहोत. आणि पोलीस गस्त घालत आहेत. संपूर्ण परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोन जण जखमी झाले आहेत.”

चकमकीदरम्यान पत्रकारांनी चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये, जमाव रस्त्याच्या दुतर्फा एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये पोलिस जमावावर अश्रुधुराचे गोळे टाकताना दिसत आहेत. तिसऱ्या व्हिडिओमध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला घेऊन जाईपर्यंत एक गट एका व्यक्तीवर हल्ला करत असल्याचे दाखवले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

या सर्व प्रकरणावर भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी म्हटले आहे कि , काही लोक त्यांच्या चर्चेदरम्यानच्या व्हिडिओचा काही भाग संपादित करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे यामुळे मला जीवे मारण्याच्या, शिरच्छेद करण्याच्या  आणि बलात्काराच्या धमक्या येत आहेत. आपल्या कुटुंबियांना धोका असल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे. “मी पोलीस आयुक्त आणि दिल्ली पोलीस यांना टॅग केले आहे. मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना इजा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मोहम्मद जुबेर या इसमाची संपूर्ण जबाबदारी असेल असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

 

शर्मा यांच्याविरुद्ध तीन ठिकाणी गुन्हे दाखल

दरम्यान या सर्व प्रकरणात भारतीय सुन्नी मुस्लिमांच्या सुन्नी बरेलवी संघटनेच्या रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबईत भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 295A, 153A आणि 505B अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शर्मा यांच्याविरुद्ध हैदराबादमधील सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्येही  आयपीसीच्या कलम १५३ (ए), ५०४, ५०५ (२) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शिवाय भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) नेत्याच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाच्या संदर्भात पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यातही  31 मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. या वादात यापूर्वीही भाजप प्रवक्त्यावर दोन गुन्हे दाखल झाले होते.


शर्मा यांनी “प्रेषित आणि इस्लाम धर्माविरुद्ध अपमानास्पद, खोटे आणि आक्षेपार्ह शब्द वापरले आणि मुस्लिमांच्या भावना दुखावल्या” असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


दंगेखोरांवर कडक कारवाईचे योगी यांचे आदेश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर असतानाच, येथे झालेल्या हिंसाचारानंतर, आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन घेण्याच्या तयारीत आहेत. सीएम योगींनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींवर गँगस्टर अ‍ॅक्ट लावण्याची तसेच बुलडोझर चालविण्याची तयारीही सुरू झाली आहे. एवढेच नाही, तर संबंधित हुल्लडबाजांची मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे.

कानपूर येथील चकेरी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप दिल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथेच मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा आणि डीजीपी डीएस चौहान यांच्याकडून हिंसाचारासंदर्भात माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी, एकही दोषी सुटणार नाही, अशा पद्धतीने दंगलखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनाही फोन करून हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

डीजीपींना सूचना देताना योगी म्हणाले, हुल्लडबाजांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर गँगस्टरची कारवाई करा, त्यांच्यावर कठोराती कठोर कलमे लावा आणि त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर रासुका अंतर्गतही कारवाई करा, जेणेकरून भविष्यात कोणी हुल्लडबाजी करण्याचा विचारही मनात आणणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!