RanaNewsUpdate : ….मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून नामर्दासारखे काम केले : आ.रवि राणा

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या दिवशीही करणार हनुमान मंदिरात महाआरती…
नवी दिल्ली : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक सभेत आपण मर्द असल्याचे सांगतात. मात्र नवनीत राणा यांच्यासारख्या मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून त्यांनी नामर्दासारखे काम केले आहे. दिवंगत बाळासाहेबही हे पाहून दु:खी होत असतील आणि विचार करत असतील की कोणाच्या हातात शिवसेनेचा कारभार गेला आहे,’ असे म्हणत अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली आहे.
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा सध्या दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान एका पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. १४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा होत असल्याने आम्हीही १४ मेला सकाळी दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करणार आहोत. तसंच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलण्याची सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करणार आहोत, अशी घोषणा रवी राणा यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोह कायद्याच्या फेरविचार याचिकेवर महत्वाचा निर्णय दिला आहे. या कायद्यासंदर्भात फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयाने राजद्रोहाचं कलम तात्पुरतं स्थगित केलं आहे. यावरील फेरविचार पूर्ण होईपर्यंत या कलमाअंतर्गत कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ नये असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यानंतर आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या निर्णयाबाबत भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
साडेसातीतून महाराष्ट्राची मुक्तता व्हावी म्हणून आम्ही हनुमान चालिसा वाचणार होतो…
“इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्यांविरोधात राजद्रोहाचे कलम इंग्रजांनी लावले होते. आपल्या हिंदू संस्कृतीवर आलेले संकट, साडेसाती आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहे. अशा परिस्थितीतून हनुमान चालिसा वाचून त्यातून मुक्तता मिळाली पाहिजे या उद्देशाने आम्ही पाऊल उचलेले होते.
राणा दाम्पत्याच्या विरोधात सरकार न्यायालयात
जामिनावर अटी शर्तीसह सुटलेले राणा दाम्पत्य रोज सरकारच्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मीडियाशी बोलत असल्याने न्यायालयाच्या आदेशाचा त्यांच्याकडून अवमान होत असल्याची तक्रार विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने त्यांना करणे दाखवा नोटीस बजावूनही राणा दाम्पत्याचे प्रसिद्धी माध्यमांशी बोलणे चालूच आहे. दरम्यान त्यांनी लीलावती रुग्नालयातील उपचारादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मुंबईच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.