MumbaiNewsUpdate : राजर्षी शाहू महाराजांना राज्य सरकारची आदरांजली, देशभरातून मानवंदना

मुंबई : बहुजनांच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी राज्यात आणि देशभरात त्यांना अदारंजाळी वाहण्यात आली. सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून त्यांना मानवंदना देण्यात आली .यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शाहू महाराजांच्या कार्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली . यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “अजूनही ज्या वृत्तीविरोधात शाहू महाराज लढले ती वृत्ती अजूनही संपलेली नाही “असे उद्गार काढत त्यांचे कार्य पुढे नेण्याची गरज प्रतिपादन केली.
कोल्हापुरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन
दरम्यान कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभरात शाहू राजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज (६ मे) १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने शाहू समाधी स्थळ येथे शाहू छत्रपती, संभाजी छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले.कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडूनही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिना निमित्त सकाळी १० वाजता पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांनी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन केले.
शिव-शाहुज्योतीचे स्वागत
स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे शिव-शाहुज्योतीचे स्वागत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.कोल्हापूरमधील अभिवादनावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजी छत्रपती इत्यादी उपस्थित होते.यानिमित्ताने कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने “माणगाव परिषद १९२०” लघुपटाचे थेट प्रसारण केले.
सातत्याने दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे राजे
मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले कि , “काही राजांचा स्मृतीदिन आठवावा लागेल एवढे ते दीन होते. फक्त गादीवर बसले म्हणून राजे झाले. पण जर नीट विचार केला तर मला नाही वाटत की हे राजे कधी आरामात गादीवर बसले असतील. सातत्याने दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे हे राजे होते. शाहू महारांज्या आयुष्यात अनेक संघर्ष झाले. काही जण कुचाळक्या करत असतात. तुम्ही स्मारक बांधणार पण पैसे कुठे आहेत असे म्हणतात. या वृत्तीच्याच विरोधात शाहू महाराज लढले आहेत. त्यांनी जो संघर्ष केला तो याच वृत्तीच्या विरोधात. ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
औरंगाबाद येथेही आदरांजली
कोल्हापूर प्रमाणे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या औरंगाबाद येथेही कोल्हापूर प्रमाणे मिल कॉर्नर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळा स्थळी सकाळी बरोबर १०:०० वाजता १०० सेकंद निश्चल राहून,शाहू महाराजांच्या कार्याचे मनन करून फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा चालविण्याचा निश्चय करून छत्रपती शाहू महाराजांना अभिनव अशा पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी अर्थशक्ती मंचाचे अध्यक्ष उज्वलकुमार म्हस्के,सचिव -प्रसाद साळवे,कोषाध्यक्ष-ऍड.संदीप चव्हाण,कार्याध्यक्ष-आनंद सातदिवे यांच्यासह चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.