MumbaiNewsUpdate : मुख्यमंत्र्यांशी पंगा महागात पडला, राणा पती – पत्नी १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत

मुबई : मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट करणे राणा दाम्पत्याला चांगलेच महागात पडले असून न्यायालयाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी काल नवनीत राणा आणि रवी राणा यांना ताब्यात घेऊन आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर उभे करून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पोलीस कोठडीची मागणी अमान्य करीत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दांम्पत्यावर १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. दरम्यान दोघांच्या जामिनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
तत्काळ सुनावणीस नकार
दरम्यान न्यायालयाने त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा आणि नवनीत राणा यांची कारागृहात रवानगी होत आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी शनिवारी अटक केली होता. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. धार्मिक कारणावरून दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे व एकोप्याला बाधक कृती केल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दांपत्याच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर राणा दांम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, “आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर २७ तारखेला आमचे लेखी म्हणणे मांडण्यासाठी सांगितले आहे. यावर २९ तारखेला सुनावणी होणार आहे. तसेच यामध्ये १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
घरत पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचे असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. परंतु मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केले. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनालाच आव्हान दिले. त्यामुळे त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, अखेर पोलिसांनी त्यांच्या विरोधात १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
दरम्यान रणाचे वकील रिझवान मर्चंट यांनी म्हटले आहे की, खार पोलिसांनी नवनीत आणि रवी राणा यांच्या तक्रारीवरून दुसर्या बाजूने एफआयआर नोंदवल्यानंतर, पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध ३५३ आयपीसीचा आरोप म्हणून दुसरी एफआयआर नोंदवली असल्याचे दिसते, यावर आपण पुढील सुनावणीच्यावेळी बोलू.