MaharashtraNewsUpdate : GoodNews : ‘महावितरण’ कडून राज्यातील भारनियमनाबाबत दिलासादायक बातमी…

मुंबई : ऐन उन्हाळ्यात राज्यावर विजेचे संकट आल्याने कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. या वृत्तानुसार वीज उत्पादक कंपन्यांनी वीजपुरवठय़ात केलेल्या वाढीमुळे विजेची मागणी आणि पुरवठय़ाचा मेळ साधण्यात शनिवारी महावितरण कंपनीला यश आले असल्याने दिवसभरात राज्यात कुठेही भारनियमन करावे लागले नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास येणाऱ्या काळातही भारनियमन करावे लागणार नाही, अशी अपेक्षा वीज कंपनीकडून व्यक्त केली जात आहे.
याबाबत ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार व झारखंड आदी राज्यांत विजेचे साधारणत: १० ते १५ टक्के भारनियमन केले जात आहे. परंतु महावितरणकडून करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे तसेच विविध स्रोतांकडून अतिरिक्त स्वरूपात पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात विजेच्या उच्चांकी मागणीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यात कंपनीला यश आल्याने भारनियमानाचे संकट सध्या तरी टाळण्याच्या मार्गावर आहे.
दरम्यान राज्यात २४ हजार ८७७ मेगावॉट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३८० मेगावॉट, केंद्राकडून ६१०२ मेगावॅट, उरण गॅसमधून २१३ मेगावॅट, कोयना प्रकल्पातून ११३४, सीजीपीएलकडून ६२२, जीएमआरकडून २००, अदानीकडून २९५१, रतन इंडियाकडून १२०० , पॉवर एक्सचेंजमधून ४२६, साई वर्धाकडून २४०, बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १२२६ तसेच अन्य प्रकल्पांतून मिळून २४ हजार ९०० मेगावॉटच्या आसपास वीज उपलब्ध झाली. त्यामुळे राज्यातील ग्राहकांना अखंडित वीज मिळाल्याने उन्हाच्या लाहीत मोठा दिलासा मिळाला. येत्या काळातसुद्धा ही परिस्थिती कायम राहील यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.