Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : फुले , शाहू आंबेडकरांचे नाव का घायचे ? याचे शरद पवारांनी सांगितले कारण…

Spread the love

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कुणाचेही उधार ठेवायचे नाही असा जणू संकल्पच केला आहे. मनसेनेते राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर थेट काही आरोप  केले होते. या आरोपणाची दखल घेत एका बाजूला प्रसंगी याची उत्तरे देण्याचे आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि मोदी सरकारवर तोफ डागण्याची संधी पवार कधीही सोडताना दिसत नाहीत याचीच प्रचिती काल राष्ट्रवादीच्या कोल्हापूरच्या सभेत आली. या सभेत बोलताना आपण आपल्या भाषणात फुले शाहू आंबेडकरांचे नाव का घेतो ? याचे स्पष्टच उत्तर दिले. मला प्रश्न विचारणारांना महाराष्ट्र समजलाच नसल्याची खिल्लीही त्यांनी उडवली. 

काल शनिवारी करवीरनगरीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने झालेल्या विराट सभेत बोलताना पवार म्हणाले कि ,  “माझ्यावर फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही? अशी टीका करण्यात आली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे तुमच्या माझ्या अंतःकरणात लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा आगळावेगळा राजा होऊन गेला. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून राज्य प्रस्तापित करण्याचे ऐतिहासिक काम कोणी केले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. या देशात अनेकांची राज्ये येऊन गेली, पण ३००-४०० वर्षांनंतर कोणाची आठवण येत असेल तर एकच उत्तर येते छत्रपती शिवाजी महाराज. सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये स्थान प्रस्तापित केलेले हे नेते होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचे नव्हते, ते रयतेचे होते, हिंदवी स्वराज्याचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे त्यासाठी कुणी सांगायची आवश्यकता नाही,” असे शरद पवार म्हणाले.

शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अभिमान हा प्रत्येक माणसाला असला पाहिजे….

“महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाबाबत पहिले काम खऱ्या अर्थाने कोणी केले असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. शाहू महाराज आगळेवेगळे राजे होते. खोट्या गोष्टीचा पुरस्कार त्यांनी कधी केला नाही. तसेच देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान देखील खूप मोठं आहे. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अभिमान हा प्रत्येक माणसाला असला पाहिजे. जे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता असे विचारतात त्यांना महाराष्ट्र समजलाच नाही,” असा टोला पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.

दरम्यान शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत , अशी टीका राज यांनी केली होती. त्यामुळे छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकाविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज यांनी आपल्या भाषणात केला होता. या आरोपाला संभाजी ब्रिगेडनेही उत्तर दिले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!