MaharashtraPoliticalUpdate : गर्ल फ्रेंड, मित्र आणि लग्नाविषयी काय बोलले प्रकाश आंबेडकर ?

मुंबई : आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी युतीशिवाय राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यास भाजपची बी टीम अशी टीका करणाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा युतीची बोलणी करण्यास आपण तयार असल्याचे आवाहन केले आहे. या आधीही त्यांनी अकोला येथे बोलताना त्यांनी आपली युतीविषयीची भूमिका खुले आम जाहीर केली होती परंतु काँग्रेस-सेनेकडून अद्याप यावर कुठलेही उत्तर आले नाही. या दोन पक्षांपैकी काँग्रेसच्या युतीचा निर्णय दिल्ली हायकमांडकडे असला तरी शिवसेनेचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकतात परंतु त्यांच्याकडूनही त्यांच्या या युतीच्या निमंत्रणाचा उत्तर आले नाही. अर्थात प्रकाश आंबेडकर यांना उत्तराची अपेक्षा आहे हेच पुन्हा एकदा त्यांच्या या आवाहनावरून स्पष्ट झाले आहे.
आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांनी पुन्हा एकदा या विषयावर छेडले असतात अत्यंत स्वच्छपणे पण विनोदी शैलीत आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले कि, आम्ही शिवसेना आणि काँग्रेस बरोबर जायला तयार आहोत, पण त्यांना आमच्याबरोबर यायचंय का, हे आता त्यांनी ठरवावं. तसेच वंचित ही भाजपची ‘बी’ टीम आहे म्हणणाऱ्यांना त्यांनी मित्रत्वाचा सल्ला देताना खुले आवाहन केले कि , आमचे मालक होण्यापेक्षा मित्र व्हा. पण त्यांना आम्ही फक्त गर्लफ्रेंड म्हणून पाहिजे, ते आमच्याबरोबर लग्नाला तयार नाहीत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“मातोश्री “च्या भेटीत काय घडलं?
या विषयी आणखी खुलासा करताना ते म्हणाले कि , “पाठीमागे आमदार कपिल पाटील यांनी मला फोन करुन राजकीय चर्चेसाठी आपल्याला मातोश्रीवर जायचं आहे, असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे मी, कपील पाटील, धनराज वंजारी आम्ही सगळे मातोश्रीवर गेलो. तिथे राजकीय चर्चा झाली. पण संपूर्ण चर्चेत युती हा शब्द देखील काढला नाही. किंवा राजकीय अॅडजेस्टमेंट हा शब्द आला नाही. एकत्र येऊन लढावं, असं आलं. आपण पुन्हा बसू आणि मनामध्ये आहे, ती चर्चा करु, असं आम्हाला सांगितलं गेलं. मग मनामध्ये असलेलं ओठावर येत नाही, तोपर्यंत पुढे कसं जायचं?”.
आम्हाला गर्लफ्रेंड म्हणून राहायचं नाही
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले कि, लोकांना आमच्याशी मैत्री करायची आहे पण निवडणूक काळात लग्न करायला नकार असतो. आणि आम्ही गर्लफ्रेंड म्हणून राहिले पाहिजे. शिवसेनेबरोबर जायला हरकत नाही, असा आमचा निर्णय झाला आहे. काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास आमची हरकत नाही. पण भाजपबरोबर कधीच जायच नाही, भाजपबरोबर कधीच राजकीय अॅडजेस्टमेंट करणार नाही”.
दरम्यान “वंचित ही भाजपची बी टीम आहे, असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, आमचे मालक होण्यापेक्षा मित्र व्हा. आम्ही सेना आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत. प्रश्न आता त्या त्या पक्षाचा आहे. त्यांना जर आमची साथ हवी असेल तर त्यांनी पुढचं पाऊल टाकावं. आमचं कुणीही मालक होऊ शकत नाही. साथीदार होऊ शकता”, असंही आंबेडकर म्हणाले.