Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : शरद पवारांचे ठरले !! भाजपाला हटविण्याचा केला निर्धार , कर्नाटकात केली घोषणा…

Spread the love

बेंगळुरू : देशात भाजपला थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठरवले असून याच मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी आज कर्नाटकात धडक मारीत आपला हा संकल्प  जारी केला. शरद पवार बेंगळुरू मध्ये पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना पवार यांनी देशपातळीवर भाजप विरोधी आघाडी उभारण्यासाठी आपण सक्रिय झाल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार  दोन दिवसांच्या बेंगळुरू दौऱ्यावर असून आज माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी आघाडी उभारण्यासाठी लवकरच पावले टाकली जातील, असे स्पष्ट संकेत दिले.

प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले कि , ‘भाजपच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आम्हाला तसे लेखी कळवले आहे. याचा पुढाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. इतर नेत्यांशी बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख अद्याप ठरलेली नाही’, असे पवार यांनी नमूद केले. ‘आज देशात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची व समभाव कसा राहील हे पाहण्याची आवश्यकता आहे’, असे पवार यांनी सांगितले. पेट्रोल , डिझेल , गॅस , खाद्यतेल यांच्या किमती वाढत आहेत. त्या सामान्य माणसाला त्रासदायक आहेत. आज त्याही प्रश्नावर जनमत तयार करावे लागणार असून त्यासाठी विरोधकांचा ऐक्य महत्त्वाचे ठरणार आहे, असे पवार म्हणाले.

दरम्यान, बेंगळुरूतील बनासवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यात पक्षवाढीचा संकल्प पवार यांनी बोलून दाखवला. ‘आम्ही देशपातळीवर पक्षाची बांधणी करत आहोत. ज्या राज्यात पक्षाची शक्ती कमी आहे अशा राज्यांपैकी कर्नाटक एक राज्य आहे. इथे थोडे जास्त लक्ष देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. पुढील संपूर्ण वर्ष मी किंवा माझे सहकारी अधूनमधून या ठिकाणी येऊन पक्षाचे काम वाढवतील’, अशा शब्दांत पवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!