GunratnaSadavarteNewsUpdate : गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी , आता अकोट पोलीस अटकेच्या तयारीत

सातारा : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ला बोल आंदोलन प्रकरणात अटक करण्यात आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत . त्यांची ४ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर गिरगाव न्यायालयापाठोपाठ सातारा न्यायालयानेही १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आता अकोट न्यायालयाने अकोट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातही अकोट न्यायालयाने सदावर्ते यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी सदावर्तेंना अटक करत न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. तेंव्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अकोट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असून अकोट न्यायालयाने सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी अकोट पोलिसांना परवानगी दिली आहे. या संदर्भात उद्या मंगळवारी अधिकृत आदेश निघाल्यानंतर अकोट पोलीस त्यांच्यावर अटकेची कारवाई करतील असे सांगण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यातही गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील व अन्य दोन जणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.