MumbaiNewsUpdate : ‘सिल्व्हर ओक ‘वरील हल्ला समर्थनीय नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दिवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आली आहे. नेत्यांच्या घरावरील आंदोलन समर्थनीय नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी फेसबुक पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे कि , ‘ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो’.
‘गेल्या ५ महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो, असं फडणवीस यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भाषणे तपासली पाहिजेत, अशी मागणी केली होती. त्यांनतर आता मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून त्यांना त्यांच्या परळ येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाविरोधात १०७ आंदोलकांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान साधारण ७.३० वाजताच्या सुमारास ४ ते ५ पोलीस सदावर्ते यांच्या घरी पोहोचले होते आणि ताब्यात घेतले. शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांची चौकशी करणार आहेत.