AurangabadNewsUpdate : हृदयद्रावक : शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दहावीच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू , दोघे वाचले

सिल्लोड : दहावीचा पेपर सोडवून शेततळ्यात पोहोण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला तर त्यांच्यासोबतची दोन मुले वाचली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अनाड रस्त्याजवळ एका शेतातील शेत तळ्यात बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेरखान नासिरखांन पठान(वय १६, रा.उर्दू शाळेजवळ अजिंठा), शेख मोहमद अनस हब्दुल हाफिज(वय १६, रा.उर्दूशाळेजवळ अजिंठा) आणि अक्रमखान आयुबखान पठान(वय १६ वर्ष रा.बगीचा मज्जीत समोर अजिंठा) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर, रेहान खान इरफान खान(वय १६ वर्ष रा.अजिंठा) आणि फैजानखान शफीखान(वय १६ वर्ष रा.अजिंठा) हे या घटनेतून बचावले आहेत. ही पाच मुले बुधवारी सकाळी १०:३० वाजता अजिंठा येथील उर्दू शाळेत विज्ञान विषयाचा पेपर देण्यासाठी गेले होते. दुपारी १ वाजता त्यांनी पेपर दिला आणि कोणालाही न सांगता परस्पर अनाड रोडवरील अजिंठा येथील सतीश चव्हाण यांच्या शेतातील तळ्यात पोहण्यासाठी उतरले. त्यांना पोहता येत नव्हते मात्र ते नेहमी एका झाडाला असलेली ठिबकची नळी पकडून याच शेत तळ्यात आंघोळ करत असत. मात्र आज आंघोळ करत आतांना ती नळी तुटली आणि तिघांचा बुडून अंत झाला, तर दोघे बालंबाल बचावले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण, शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारी वरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.