MaharashtraPoliticalNewsLatest : नवाब मलिक यांच्या ‘ईडी ‘ अटकेनंतर राज्यातील राजकीय हालचाली वाढल्या….

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना जवळपास आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अधिक सक्रिय झाले असल्याचे वृत्त असून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सिल्व्हर यॉर्कवर जमण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात शरद पवार लवकरच बोलण्याची शक्यता आहे. मनी लाँडिरग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत ईडीने अल्पसंख्याकमंत्री नवाब मेल्क यांना अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप नेत्यांवर आरोप – प्रत्यारोप करीत होते. त्यामुळे ते लवकरच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर येण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी सकाळी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते . अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकले होते . त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.
या कारवाईच्या आधी , ”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता. तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत.
विशेष न्यायालयात सुरु आहे सुनावणी
ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर विशेष न्यायालयात हजर केले असून या ठिकाणी जवळपास तासभरापासून सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नवाब मलिकांबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो, याची सर्वांनी उत्सुकता आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
नवाब मलिकांच्या अटकेवर नेत्यांच्या प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त करतानाच आपण कुणासमोर झुकणार नसल्याचे म्हटले आहे. “ते इतका अतिरेक करतील हे जरा आश्चर्यकारक होते . महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणी घेतली नव्हती. भाजपातले काही लोक सातत्याने ट्वीट करत होते की १५ दिवसांनी अटक होईल, छापे पडतील. ते खरे झाले आहे कारण ईडी आणि भाजपा एकच आहे असा अर्थ आता काढावा लागेल”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक : दरम्यान नवाब मलिक यांनी आज ईडी कडून आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिलव्हर ओक येथे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान मला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणले तिथे समन्सवर सही करण्यास सांगितले . ईडीने मला अटक केली असली तरी मी घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर अशी प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेब थोरात : “नवाब मालिकांनी विचारलेले प्रश्न भाजपाच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्याविरोधात ईडीची कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचे राजकारण या देशात कधीही झाले नाही, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे पण ते यशस्वी होणार नाही.” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
मालिकांच्या अटकेवर भाजपनेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे कि , मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून एनसीपी आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल. बरेचजण गोत्यात येतील. तर “अनिल देशमुख यांच्यानंतर मलिक आणि नंतर अनिल परब. उद्धव ठाकरे सरकारच्या सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल. ” अशा शब्दांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.