Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक , आजपासून राज्यभर आंदोलनाचा इशारा 

Spread the love

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झालेली असली तरी त्यांचा न्यायदेवतेपुढे गु्न्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर भुजबळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी आजपासून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसतर्फे आंदोलन पुकारण्यात आल्याचेही भुजबळ यांनी जाहीर केले आहे.


मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या निवास्थानी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्याकडील पद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले होते. आता जर नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागल्यास त्यांच्याकडील पदे कोणाकडे द्यावीत यावर वर्षा या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विचार विनिमय झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवाब मलिक यांना ८ दिवसांची ईडी कोठडी


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना १४ दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी ईडीने केल्यानंतर विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ही ८ दिवसांची म्हणजेच ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली. नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) यांना अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी ईडीने मलिक यांची तब्बल सात तास चौकशी केली. राष्ट्रीय तपास संस्थेच्या एफआयआरच्याआधारे सुरू असलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दाऊदचा भाचा अलिशाह पारकर व छोटा शकीलचा पंटर सलीम फ्रुटच्या जबानीनुसार मलिक यांना अटक केल्याची ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली.

नवाब मलिक यांच्यावर नेमका आरोप काय आहे  ?

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला काश्मिरातील कारवायांसाठी आर्थिक पुरवठा करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएने दाऊदविरुद्ध बेकायदेशीर कृत्यविरोधी कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यासाठीचा पैसा हवालामार्फत मुंबईतून दाऊदपर्यंत किंवा दाऊदच्या सांगण्यावरुन मुंबईतून काश्मिरला पुरवला जात असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. यांत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्यानेच आता ‘एनआयए’ च्या एफआयआर आधारे ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गतच दाऊदची बहिण हसिना पारकरच्या बंद घरावर तसेच मुंबई व ठाण्यात मिळून दहा ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्याअंतर्गतच अलिशाह पारकर, याची चौकशीही ईडीने केली होती. मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित काही मालमत्ता कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप ‘ईडी’ने मलिक यांच्यावर ठेवला आहे.

न्यायालयात काय झाले ?


दरम्यान या प्रकरणी युक्तीवाद करताना अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी युक्तीवाद करताना म्हणाले की, फेब्रुवारी रोजी दाऊद इब्राहिम विरुद्ध एनआयएने एफआयआर नोंदवला, त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. दाऊदचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे आहेत, दहशतवादी कृत्ये, बनावट नोटा चलनात आणणे, अवैध पैशांचा व्यवहार, हवाला, त्याचे लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-महंमद, अल-कैदा अशा अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही संबंध. त्याची बहीण हसीना पारकर हिचाही गुन्ह्यात संबंध होता. कुर्ल्यामध्ये गोवावाला कंपाऊंड ही मालमत्ता हसीनाच्या मालकीची आहे. ईडीच्या तपासात असे निष्पन्न झाले की, कुर्लामधील गोवावाला कंपाऊंड मालमत्ता वारसा हक्काप्रमाणे मरियम आणि मुनिरा प्लंबर यांच्या मालकीची होती. ती मालमत्ता नवाब मलिक यांच्या मालकीच्या कंपनीने दाऊदच्या डी-गॅंगच्या लोकांशी संगनमत करून विकत घेतली. मुनिराने मालमत्ता मलिक यांच्या कंपनीला विकली, याची माहिती मरियमला प्रसारमाध्यमांच्या बातम्या पाहिल्यानंतरच समजले. मरियमने एक कुलमुखत्यारपत्र दिले होते, पण ते फक्त अतिक्रमणे हटवण्याविषयीच्या कार्यवाहीसाठी दिले होते, मालमत्ता विकण्यासाठी दिलेले नव्हते. तिने कधीही मालमत्तेवरचा हक्क सोडला नव्हता. कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करण्यात आला, असे तपासात निष्पन्न झाले.

नवाब मलिक यांच्या वकिलाचा युक्तिवाद

ईडीने न्यायालयात सांगितले कि , हसीना पारकरचा साथीदार सलीम पटेलने कुमुखत्यारपत्राचा गैरवापर करत हसीना पारकरच्या नावे मालमत्ता विक्री व्यवहार केला आणि ती तीन कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता ५५ लाख रुपयांना नवाब मलिक यांच्या कंपनीला विकली. यावेळी नवाब मलिक यांची बाजू मांडणारे वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, मनी लॉडरिंग कायदा नंतर आला त्याच्या खूप आधी मालमत्ता व्यवहार झाला. सन १९९९ ते २००३ मधल्या व्यवहाराचा ईडी आता फेब्रुवारीमध्ये तपास करते आणि कायद्याच्या तरतुदीनुसार खूप जुन्या व्यवहारांना हि कलमे लावली जातात, असा ईडीचा उघड भोंगळ कारभार सुरू आहे. अशा प्रकारच्या निराधार आरोपांवर ईडीसारखी गंभीर तपास यंत्रणा मलिक यांना भर सकाळी ६ वाजता घरातून उचलते आणि बळजबरीने ताब्यात घेऊन नंतर अटक करते, हे सर्व गंभीर आहे. मनी लॉडेरिंग कायदा हा खूप कडक आहे, त्यातील कलमे खूप कडक आहेत. त्यांचा तपास यंत्रणेने गैरवापर चालवलाय. ईडीच्या रिमांड अर्जात काहीच आधार नाहीत, तरीही लोकप्रतिनिधीला, मंत्र्याला अटक करून त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध आहेत, असे चित्र तपास यंत्रणेकडून तयार केले जाते.

राज्यात एकच खळबळ उडाली

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना इडी कडून अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळाच्या बैठकी सुरु झाल्या. हे होत असताना राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्ते या गोष्टीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील आता या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी इडी च्या मुंबई कार्यालयाकडे रवाना होत संतप्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून इडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केंद्र सरकार हा बळाचा वापर करत असल्याचा आरोप करत ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मात्र दिल्लीच्या तक्ता पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही हा इतिहास असल्याचे सांगत केंद्र सरकारचा हा बळ प्रयोग महाराष्ट्राची जनता सहन करणार नसल्याचे ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंगेसकडून सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे इडी किंवा इन्कम टॅक्सची लाख कारवाई केली तरी महाविकास आघाडी ही ५ वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला. शरद पवार यांना ज्यावेळी इडी कडून चौकशीसाठी बोलावले होते त्यावेळी देखील आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि महाविकास आघाडीतील कुठल्याही नेता किंवा कार्यकर्त्याच्या विरोधात इडीचा वापर करून कारवाई केली तर आम्ही त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा ठाणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांनी दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!