AurangabadNewsUpdate : शेततळ्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला , तीन अल्पवयीन तरुणाचा बुडून मृत्यू

औरंगाबाद : बजाजनगरमधील सारा संगम सोसायटीतील तीन तरुण मित्रांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याची घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक आनंद भिसे (वय १५ वर्ष, रा भोंडवे शाळेजवळ सारा संगम, बजाजनगर), तिरूपती मारोती कुदळकर (वय १५ वर्ष, रा सारासंगम बजाजनगर) आणि शिवराज संजय पवार (वय १७ वर्ष, रा सारासंगम बजाजनगर) अशी या घटनेत जीव गमवावा लागलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही मित्र दोन सायकली घेऊन रविवारी (दि २०) सकाळी भांगसी माता गडावर दर्शनासाठी गेले होते.
याच परिसरात डोंगराच्या पायथ्याशी शेकापूर शिवारात गट क्र ८/४ येथे नारायण हरिशचंद्र वाघमारे यांचे शेत असून, या शेतात शेततळे बांधलेले आहे. या शेततळ्याला कुंपण घातलेले असून, एका बाजूला कुंपणाचा काही भाग तुटलेला आहे. याच तुटलेल्या कुंपणातून घुसून तिघेही शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. शेततळ्यात उतरण्याआधी त्यांनी कपडे, चप्पल, बेल्ट, स्वेटर काठावर काढून ठेवले होते. मात्र, शेततळ्यात उतरल्यावर पोहता येत नसल्याने किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
दुसरीकडे, काल घरातून बाहेर पडलेली मुले परत न आल्याने त्यांच्या घरची मंडळी त्यांचा शोध घेत होती. असाच शोध घेताना एकाला वाघमारे यांच्या शेतातील शेततळ्यापासून सुमारे १५० मीटर अंतरावर मुलांनी घेऊन गेलेल्या दोन्ही सायकली उभ्या दिसल्या. तर शेततळ्याजवळ त्यांचे कपडे, चपला आढळल्या. यानंतर तातडीने दौलताबाद पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक गोवर्धन चव्हाण, पोलिस अंमलदार सचिन त्रिभुवन, विकास करंजे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. शेततळ्यात उतरून मुलांचे मृतदेह काढणे अवघड असल्याने अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन तिन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले. यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. दौलताबाद पोलिस घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौलताबाद पोलिस करंत आहेत.