MumbaiNewsUpdate : अखेर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल , बघा काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली : ठाणे पोलिसांनी अखेर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, एनसीबीचे मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात हॉटेल आणि बारचा परवाना मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच खोटी माहिती देऊन आणि फसवणूक करून हा परवाना घेतल्याचा ठपका ठेवत नवी मुंबईतील हॉटेल आणि बारचा परवाना जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रद्द केला.
या विषयी अधिक माहिती देताना , ठाण्याचे पोलिस उपायुक्त डॉ. विजय कुमार राठोड यांनी सांगितले की, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शनिवारी रात्री येथील कोपरी पोलिस ठाण्यात वानखेडेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. उल्लेखनीय आहे की, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आरोप केला होता की, वानखेडे यांचा नवी मुंबईतील वाशी येथे परमिट रूम आणि बार आहे, ज्याचा परवाना १९९७ मध्ये मिळाला होता, जेव्हा वानखेडे अल्पवयीन होते आणि त्यामुळे ते बेकायदेशीर होते. आहे. सरकारी सेवेत असूनही वानखेडे यांच्याकडे परमिट रूम चालवण्याचा परवाना आहे, जो सेवा नियमांच्या विरोधात आहे, असेही मलिक म्हणाले होते. त्यानंतर वानखेडे यांनी मंत्र्यांचे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना बारच्या परवान्याबाबत नोटीस बजावली होती.
तत्पूर्वी, एका अधिकाऱ्याने निदर्शनास आणून दिले होते की, वानखेडे यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरानंतर आणि या प्रकरणाच्या तपासानंतर, जिल्हा दंडाधिकारी या निष्कर्षापर्यंत पोहोचले की वानखेडे यांनी २७ ऑक्टोबर १९९७ रोजी परवाना प्राप्त केला होता, जेव्हा वानखेडे यांचे वय १८ वर्षे होते जे परवाना देण्यासाठी नियमबाह्य आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वानखेडे यांनी एका जहाजावर छापा टाकला आणि तेथून अमली पदार्थ जप्त केल्याचा दावा केल्यापासून मलिक यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. या छाप्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकांना आरोपी करण्यात आले होते. पुढे न्यायालयात आर्यनवरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे वानखेडे वादात अडकले आहेत.