MaharashtraPoliticalUpdate : पवारांच्या भेटीनंतर ….काँग्रेस सोडून आघाडी करणार का ? यावर केसीआर यांनी दिले हे उत्तर…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. केसीआर यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि आ. के कविता आणि पक्षाचे खासदार जे संतोष कुमार, रणजित रेड्डी आणि बी बी पाटील हे मुंबई दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलताना केसीआर म्हणाले ,कि , “नवा अजेंडा, नवी दृष्टी घेऊन हा देश व्यवस्थित चालवायचा आहे. मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. ते अनुभवी नेते आहेत, त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद दिले आहेत आणि आम्ही एकत्र काम करू. लवकरच, इतर समविचारी पक्षांसोबत बैठक आयोजित केली जाईल.
महाराष्ट्राच्या दौऱ्यात प्रारंभी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राज देखील उपस्थित होते. या भेटीनंतर केसीआर आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीची माहिती दिली. तेव्हा पत्रकारांनी काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी करणार का? असा प्रश्न विचारला. यावर केसीआर यांनी मी स्पष्ट सांगतो म्हणून आपली भूमिका मांडताना सांगितले कि , “आज आमच्या दोघांच्या चर्चेने एक सुरुवात झाली आहे. आम्ही स्पष्ट सांगितलंय की यात कोणतीही भविष्यवाणी करण्याची गरज नाही. आम्ही देशाच्या इतर नेत्यांशी चर्चा करू आणि जो निर्णय होईल तो देशासमोर ठेऊ.”
तेलांगणासाठी पवारांचे मोठे योगदान
पवारांच्या भेटीबाबत बोलताना केसीआर पुढे म्हणाले कि , “शरद पवारांनी तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी ज्या प्रकारे समर्थन दिले हे आम्ही कधीच विसरु शकत नाही. त्यामुळे तेलंगणाच्या जनतेकडून मी त्यांचे आभार मानतो. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. देशात ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा त्या पद्धतीने होत नाही आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही काही बदल झालेले नाहीत. याची कारणे आपल्याला शोधायला हवीत. नवीन आशा आणि नवीन अजेंड्यासह देशाला एकत्र पुढे घेऊन जाण्याची वेळ आली आहे. ते अनुभवी नेते आहेत, त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद दिले आहेत. एकत्र काम करण्याची गरज असण्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातल्या अन्य पक्षांसोबत एकत्र शरद पवारांकडे बारामतीमध्ये बैठक घेऊ शकतो. ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांना एकत्र घेऊन कामाला सुरुवात करु,” असे चंद्रशेखर राव म्हणाले.