UttarPradeshElectionUpdate : लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा जामिनावर बाहेर

अलाहाबाद : लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे. आशिष मिश्रा याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
आशिष मिश्रा याच्यावर 3 ऑक्टोबर रोजी तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात निषेध मोर्चा दरम्यान चार शेतकरी आणि एका पत्रकाराला लखीमपूर खेरी येथे वाहनाखाली चिरडून मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली. यूपीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे, तर लखीमपूर खेरीमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
लखीमपूर खेरी प्रकरणी दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला आरोपी बनवण्यात आले होते. यूपी पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी एफआयआर दाखल केला होता, आशिष मिश्रा आणि इतर 12 जणांना हत्येचे आरोपी म्हणून नाव दिले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर एका आठवड्यानंतर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आली.
या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने स्थानिक न्यायालयात पहिले ५,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यादरम्यान विशेष तपास पथक हजारो पानांचे आरोपपत्र घेऊन लखीमपूर खेरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोहोचले होते. विशेष तपास पथकाने दोन कुलुपात बंद असलेल्या पेटीमध्ये हे दस्तावेज न्यायालयात नेले होते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला.