AurangabadCrimeUpdate : छेड का काढली ? म्हणून विचारणाऱ्या मुख्याध्यापकावर तलवारीने हल्ला !!

औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील मक्रनपुर येथे शाळेतील मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून मुलाने चक्क मुख्याध्यापकासह शिपायावर तलवारीने हल्ला केला असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या हल्ल्यात मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि , कन्नड तालुक्यातील मक्रनपुर येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील मुलींची एक मुलगा सतत छेड काढत असे. त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक ए.पी.चव्हाण यांनी या मुलाला जाब विचारत त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलाने कोणताही विचार न करता थेट शाळेत तलवार आणून मुख्याध्यापक चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला दरम्यान याचवेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेले शिपाई संतोष जाधव यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात मुख्याध्यापक चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांचा कान फाटला आहे. तर हाताच्या दंडावर दोन ठिकाणी मोठी जखम झाली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर घटनेची माहिती मिळताच कन्नड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.मुख्याध्यापक चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी परिसरात पसरताच पालकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस अधिक तपास करीत आहेत.