India Budget 2022 Updates : सरकार विरुद्ध विरोधक : अर्थ संकल्पावर कोण काय म्हणाले ?

नवी दिली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला चौथा अर्थ संकल्प सनदेत सादर केल्यानंतर त्यावर सरकार पक्षाकडून सरकारच्या बाजूने तर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान विरोधकांच्या टीकेला निर्मला सीतारामन यांनी थेट उत्तर दिले असून त्यांनी म्हटले आहे कि , प्राप्तिकर करात कोणताही बदल न केल्याने नोकरदार व्यक्तीसाठी एक प्रकारे मोठा दिलासाच सरकारने दिला आहे. सरकारने दोन वर्षात आयकराच्या नावाने एक पैसाही वाढवला नाही. म्हणजेच हा देखील एक दिलासाच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी , सर्वसामान्यांसाठी अनुकूल आणि प्रगतीशील अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल गौरवोद्गार काढून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत. या अर्थसंकल्पात आधुनिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही विशेष भर देण्यात आला असून हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, ईशान्येतील राज्यांमध्ये पहिल्यांदाच पर्वत माला योजना सुरू करण्यात येत आहे. ही योजना डोंगराळ भागात दळणवळणाची आधुनिक व्यवस्था निर्माण करेल.
या निमित्ताने बोलताना मोदी यांनी म्हटले आहे कि , १०० वर्षांतील भयंकर संकटादरम्यान हा अर्थसंकल्प विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. गरिबांचे कल्याण हे या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गरीब व्यक्तीकडे पक्के घर असावे. नळाद्वारे पाणी, शौचालय, गॅसची सुविधा असावी या सर्वांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला बळकट करण्याबरोबरच सर्वसामान्यांसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध करून देणारा आहे. पायाभूत सुविधा, अधिकाधिक गुंतवणूक, विकास आणि नोकऱ्यांच्या भरपूर संभाव्य संधी आदींनी परिपूर्ण आहे. यामुळे ग्रीन जॉबचे क्षेत्र आणखी खुले होईल. – पंतप्रधान नरेंद्र मोदी
इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया
>अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री : आत्मनिर्भर भारताचा हा अर्थसंकल्प करोनानंतर जागतिक अर्थविश्वात निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था जगात अव्वल बनवण्यास मदतगार ठरेल
> जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप : ‘गरीब कल्याण बजेट’, हा अर्थसंकल्प गरीब आणि कामगारांना बळकटी देणारा आहे .
> रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री : अर्थसंकल्पात ६० लाख रोजगार आणि ८० लाख पक्की घरे उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प सर्व वर्गांना न्याय आणि देशाच्या विकासाला गती देणारा आहे.
> डेरेक ओब्रायन : मोदींना शेतकरी, गरीब आणि मध्यमवर्गीयांची काळजी नाही हे अर्थसंकल्पावरून स्पष्ट होत आहे.
> काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात : सत्तर वर्षांत उभारलेले विकून खाणे, हेच मोदी सरकारचे धोरण.
> : राधाकृष्ण विखे पाटील, भाजप : अर्थसंकल्पातून ग्रामीण भारताच्या विकासाचा नवा मार्ग दृष्टीक्षेपात आला आहे. कृषी क्षेत्राबरोबरच सहकारी संस्थांनाही कराच्या माध्यमातून दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न हा सहकारी संस्थांवरचा अन्याय दूर करणारा ठरेल.
> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे : हा अर्थसंकल्प गरिबांसाठी नव्हे, तर फक्त श्रीमंतांसाठी.
> भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले : अहमदनगर : केंद्रीय अर्थसंकल्पात पिकांना हमी भावासंबंधी ठोस काहीच नाही. अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळावा. नुकसान भरपाईचे निकष बदलले जावेत.
> काँग्रेस नेते राहुल गांधी : यांची टीकामोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गीय, नोकरदार वर्ग, गरीब, वंचित, तरूण आणि शेतकऱ्यांसाठी काहीच नाही.
> शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश : जर एका वाक्यात या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे वर्णन करायचे झाल्यास, परिपूर्ण, सर्वसमावेशक आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनात सकरात्मक बदल घडवून आणणारा अर्थसंकल्प.
> अनुराग ठाकूर : १४० कोटी भारतीयांसाठी लाभदायी ठरणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार.
> योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश : आत्मनिर्भर भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वागत
> अमिताभ कांत, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी : हा अर्थसंकल्प प्रगतीशील आणि दूरदर्शी आहे. भारताच्या शाश्वत विकासातील पुढच्या टप्प्याची तयारी करत आहे. भांडवली खर्चाचा मोठा विस्तार हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
> नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री : पायाभूत सुविधांसह कृषी, ग्रामीण भाग आणि सर्व क्षेत्रांच्या कल्याणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. माझ्या मंत्रालयातील ‘पर्वत माला’ प्रकल्प डोंगराळ भागासाठी मोठी भेट आहे.
> पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया : बेरोजगारी आणि महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांसाठी हे बजेट ‘झीरो’.
> अश्विनी कुमार चौबे, केंद्रीय राज्यमंत्री : हा ‘अमृत बजेट’, सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारं, सबका साथ, सबका विकास या मूलमंत्रावर आधारित या अर्थसंकल्पात सर्वांचा विचार केला आहे
> किरेन रिजिजू, केंद्रीय मंत्री : हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. गरीब, गावे, ईशान्येकडील राज्यांसाठीचा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक क्षेत्रात खूपच सुधारणा आणल्या आहेत. ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली आहे, त्या दृष्टीने खूपच उत्तम अर्थसंकल्प.
> शशी थरूर, काँग्रेस नेते : डिजिटल चलनाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर, सरकार त्या दिशेने पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसतेय. सर्वसामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पात फार काही देण्यात आलेले नाही याबाबत आम्ही जास्त चिंतीत आहोत
> चित्रा वाघ : डिजिटाइजेशन हाच भविष्यात प्रगतीचा आधार, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी खऱ्या अर्थानं डिजिटल बजेट मांडलं.
> देवेंद्र फडणवीस : भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प, सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे आभार.
> नवाब मलिक : या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय अशा कुणालाच काही मिळालेले नाही.
> स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी : ‘केंद्राच्या अर्थसंकल्पात शेती सुधारणेच्या नावाखाली स्वप्नांचा मनोरा बांधलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये यामध्ये काहीच नाही. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प आहे. कृषिक्षेत्रामध्ये डिजीटल क्रांती करण्याची भाषा अर्थमंत्र्यांची भाषा फसवी आहे.