CoronaIndiaUpdate : दिल्लीत कोरोनाची स्थिती चिंताजनक , ४० जणांचा मृत्यू तर २७ हजार ५६१ नवे रुग्ण

नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या २४ तासांत तब्बल २७ हजार ५६१ नवीन बाधितांची नोंद झाली असून ४० रुग्ण दगावल्याचे धक्कादायक वृत्त आहे. दिल्लीतील हे चित्र लक्षात घेता सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान आज पंतप्रधान या विषयावरून देशाच्या विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ज्या राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे अशा ठिकाणी अंशतः लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी कोविड पॉझिटिव्हिटी रेटही वाढल्याने आरोग्य यंत्रणा आणि दिल्लीचे सरकार अधिक सतर्क झाले आहे. त्यात गेल्या २४ तासांतील करोनाचे आकडे चिंतेत भर घालणारे ठरले आहेत. आज दिल्लीत २७ हजार ५६१ नवीन बाधितांची नोंद करण्यात आली असून २० एप्रिल २०२१ नंतरची ही २४ तासांतील सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली आहे. २० एप्रिल रोजी दिल्लीत २८ हजार ३९५ रुग्ण आढळले होते. आज कोरोनाने दिल्लीत ४० जण दगावले असून हा आकडाही चिंताजनक आहे. १० जून २०२१ नंतरचा मृतांचा हा सर्वाधिक आकडा असल्याचे सांगिरीतले जात आहे. १० जूनला ४४ रुग्ण दगावले होते. मृतांचा एकूण आकडा आता २५ हजार २४० इतका झाला आहे.
दरम्यान दिल्लीतील कोविड पॉझिटिव्हिटी रेटही चिंता वाढवणारा आहे. आज पॉझिटिव्हिटी रेट २६.२२ टक्के इतका झाला. गेल्या ५ मे रोजी पॉझिटिव्हिटी रेट २६.३२ इतका झाला होता. त्याअनुषंगानेही स्थिती गंभीर मानली जात आहे. दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या आता ८७ हजार ४४५ इतकी झाली असून ही संख्याही ८ महिन्यांतील सर्वाधिक ठरली आहे. ८ मे रोजी दिल्लीत ८७ हजार ९०७ सक्रिय रुग्ण होते. सध्या गृह विलगीकरणात ५६ हजार ९९१ रुग्ण असून रिकव्हरी रेट ९३.०३ टक्के इतका आहे. २४ तासांत १४ हजार ९५७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशात २४ तासांत १ लाख ९४ हजार ७२० नवीन कोरोना बाधितांची भर पडली असून मंगळवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत १५.८ टक्के इतकी वाढ झाली आहे. मंगळवारी १.६८ लाख रुग्णांची नोंद झाली होती.