OmicronNewsUpdate : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा उद्रेक झाल्यामुळे भारतातही सतर्कता

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये शुक्रवारी दिवसभरात ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे तब्बल ९३ हजार करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वच देशांना यातून सतर्कतेचा संदेश मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील कोविड टास्क फोर्स आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर इशारा दिला आहे. देशातील करोनाची परिस्थिती देखील त्यांनी यावेळी सांगितली. शुक्रवारी आरोग्य विभागाने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. व्ही. के. पॉल यांनी ब्रिटनमध्ये गेल्या दोन दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आणि भारतातील परिस्थिती यांची तुलना करत चिंता व्यक्त केली आहे.
यानिमित्ताने बोलताना डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले कि , जर आपण ब्रिटनमध्ये अचानक पसरू लागलेल्या करोनाचा आवाका पाहिला आणि तशाच प्रकारचा रुग्णसंख्येचा उद्रेक भारतात झाला, तर देशात दिवसाला १४ लाख करोना रुग्ण सापडतील. ओमायक्रॉन घातक ठरत असल्याची अद्याप ठोस आकडेवारी हाती आलेली नसली, तरी अजूनही हा प्रकार पूर्णपणे समजायचा असून अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. त्यामुळे केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सौम्य लक्षणे जाणवतात असे म्हटले जात आहे.
दरम्यान, समोर येणाऱ्या प्रत्येक करोना रुग्णाच्या नमुन्याचं जेनोम सिक्वेन्सिंग करणं अशक्य असल्याचं ते म्हणाले. “प्रत्येक नमुन्याचं जेनोम सिक्वेन्सिंग शक्य नाही. जेनोम सिक्वेन्सिंग हे निरीक्षण आणि साथीच्या रोगाचा आढावा घेण्याचं साधन आहे. रोगाचं निदान करण्याचं साधन नव्हे. पण शक्य तितक्या जास्त नमुन्यांचं जेनोम सिक्वेन्सिंग होईल, याची आम्ही काळजी घेऊ”, असं डॉ. पॉल यांनी नमूद केलं.
ब्रिटनमध्ये दिवसभरात तब्बल ३ हजार २०१ ओमायक्रॉनचे रुग्ण
शुक्रवारी ब्रिटनमध्ये दिवसभरात तब्बल ३ हजार २०१ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून त्या व्हेरिएंटची ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. त्यामुळे ब्रिटनमधल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा तब्बल १४ हजार ९०९ इतका झाला आहे. ब्रिटनच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांच्या कालावधीमध्ये एकूण ९३ हजार ०४५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याने आता ब्रिटनमधील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ११ लाख ९० हजार ३५४ इतकी झाली आहे.
दरम्यान भारतात शुक्रवारच्या आकडेवारीनुसार ओमायक्रॉनचे ११३ रुग्ण आहेत. एकूण ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल २६ ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात ४०, दिल्लीत २२, राजस्थानमध्ये १७, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी ८, गुजरात आणि केरळमध्ये प्रत्येकी ७ तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे.