AurangabadNewsUpdate : शिक्षणशास्त्र हा विषय महत्वाचा असून तो अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासला पाहिजे : आ. सतीश चव्हाण

मागील सरकारच्या काळात उच्च माध्यमिक स्तरावर करण्यात आलेली विषय रचना ही काही विषयावर अन्यायकारक असून या विषय रचनेमुळे काही महत्वाचे विषय दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. त्यात शिक्षणशास्त्र हा एक विषय आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिक्षणशास्त्र हा विषय राज्यात शिक्षणव्यवस्था मजबूत करण्यात योगदान दिला असून तो निश्चितच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासला पाहिजे. त्यामुळे या विषयाला ग्रुप सी मध्ये ठेवण्याऐवजी तो ऐच्छिक करण्यात यावा यासाठी मी नक्की पाठपुरावा करेन असे आश्वासन आमदार सतीश चव्हाण यांनी शिक्षणशास्त्र विषय संघटनेच्या पदीधिकाऱ्यास दिले.
राज्यात उच्च माध्यमिक स्तरावर दिनांक ०८ ऑगस्ट २०१९ च्या सुधारित विषय व मूल्यमापन योजनेनुसार पूर्वीच्या विषय रचनेत बदल करून पूर्वी ऐच्छिक असणारा शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप सी मध्ये समाविष्ट केला आहे.
नवीन विषय रचनेनुसार ग्रुप सी मध्ये एकूण १८ विषय असून यातील फक्त एक विषय निवडण्याची किंवा नाही जरी निवडले तरी चालेल अशी विषय रचना अमलात आणली आहे. यामुळे राज्यात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्र विषय निवडता येत नाही. याचा पुढे डी.एड., बी.ए. शिक्षणशास्त्र, बी.एड., एम.एड., एम.ए. शिक्षणशास्त्र, एम.फिल, पीएच.डी.(शिक्षणशास्त्र) या अभ्यासक्रमावर देखील परिणाम होणार आहे.
त्यामुळे शिक्षणशास्त्र हा विषय बहुसंख्य विद्यार्थ्यांना अभ्यासता यावा यासाठी त्याचा समावेश मधून ग्रुप सी मधून ग्रुप बी मध्ये करावा आणि शिक्षणशास्त्र विषय विज्ञान शाखेसाठी पूर्ववत सुरू ठेवावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणशास्त्र परिषदेच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांची भेट घेत प्रा. रामकीशन मोगल, डॉ. धनंजय खेबडे,प्रा. सिद्धार्थ कुलकर्णी प्रा. प्रल्हाद गायकवाड, प्रा. संजीवकुमार सुर्वे, प्रा. कर्तीराज लोणारे, प्रा. ज्ञानेश्वर उबाळे,प्रा. नीलकंठ हजारे यांनी निवेदन दिले. त्यावर आ. सतीश चव्हाण यांनी सदरील विषय कला शाखेसाठी आणि विज्ञान शाखेसाठी ऐच्छिक करण्याचे अश्वाशीत केले.