#AurangabadUpdate | रिक्षाचालकाच्या हुलकावणीमुळे महिलेचा जागीच मृत्यू

औरंगाबाद: बँकेत कामानिमित्त जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला रिक्षाचालकाने हुलकावणी दिल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या धडकेत ३४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू तर पती जखमी झाले.ही घटना गुरुवार दि.२ रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूर येथील ओयासिसी चौकात घडली.
राधा बाबू भालेराव वय ३४ गट न.१२ वडगाव कोल्हाटी असे मयत महिलेचे नाव आहे. बाबू किशन भालेराव वय ३८ रा. गट न.१२ वडगाव कोल्हाटी असे जखमी पतीचे नाव आहे. बाबू हे एका खाजगी कंपनीत नोकरीला असून पत्नी राधा या घरकाम करत होत्या. दरम्यान गुरुवार दि.२ रोजी दुपारी बाबू हे पत्नी राधा यांना घेऊन कामानिमित्त बँकेत जात होते.यावेळी समोर असलेल्या रिक्षाने दुचाकीला हुलकावणी दिल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव गॅस ट्रकने मागून धडक दिली.यात बाबू हे दूर फेकले गेले तर पत्नी ट्रकच्या समोरील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान ट्रॅक चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.दरम्यान या प्रकरणी बातमी देई पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. राधा यांच्या पश्चात दोन लहान मुले आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.