Abhivyakti : स्मरण : …. ज्यांच्या लग्नाच्या पंगतीवर बहिष्कार टाकला ते बाळासाहेब पवार पुढे जालन्याचे खासदार झाले !!

मराठवाड्याचे लढवय्ये नेते दिवंगत खासदार बाळासाहेब पवार यांची आज २२ वी पुण्यतिथी. आपल्या कार्यकर्तृत्वाने बाळासाहेब पवार यांनी स्वतःला सामाजिक, शैक्षणिक कार्यात झोकून देऊन राजकीय क्षेत्रात असतानाही सामाजिक कार्यात आपले मौलिक योगदान दिले. राजकीय क्षेत्रात अत्यंत स्वाभिमानाने आयुष्य जगलेल्या बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ऑनलाईन सर्चिंग करीत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेल्या न्यायालयीन खटल्यात बाळासाहेब पवार यांच्या सासऱ्यांशी संबंधित घटनेचा उल्लेख वाचण्यात आला तीच घटना येथे वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत. या निमित्ताने बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन आणि भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायास शतशः प्रणाम !! : संपादक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून असली तरी त्यांच्या अनेक भूमिकांनी देशाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक उत्थानाचा मार्ग दाखवला आहे. आपल्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध न्यायालयात अनेक खटले लढले आणि जिंकले पण ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा आपल्या अशिलांना न्याय देण्यासाठी स्वतःचे बुद्धीचातुर्य पणाला लावताना वकील म्हणून बाबासाहेबांनी वकिली व्यवसाय म्हणून अव्वाच्या सव्वा फीस वसूल करणे तर दूरच पण जेम तेम फीसही कधी वसूल केली नाही हे स्पष्ट होते.
याच आपल्या वकिलीच्या मालिकेत बाबासाहेबांनी वकिलीच्या काळात पहिला खटला जिंकला तो सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचा ! त्यांनी ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकातून टिळकांवर खरमरीत टीका केली होती ज्याला केशवराव जेधे यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. त्यानंतर ‘भाला’ कर भोपटकर वकिलांनी त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी पूणे यांच्याकडे तक्रार केली होती त्यामळे जिलधार्यांच्या आदेशानुसार जेधे व जवळकर यांना अटक करून येरवडा जेल मध्ये टाकले होते. या प्रकरणात डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे येऊन हा खटला लढला आणि त्यातून त्यांना निर्दोष बाहेर काढले.
बैलपोळा वतन खटला
हा बाबासाहेबांचा असाच एक आणखी गाजलेला खटला आहे . बैल पोळा वतन खटला म्हणून हा खटला प्रसिद्ध आहे. वाघाडी ता: शिरपूर , जिल्हा : पश्चिम खानदेश, आजचा धूळे इथला हा खटला आहे. त्यावेळेस हा भाग होळकर स्टेट/ प्रांतातील समजला जात होता ( शिवस्वराज्याच्या काळात तो फारूखी मनसुब्यात होता याचे कारण अहद तंजौर तहद पेशावर पर्यंत साम्राज्य असलेल्या छत्रपती शिवाजी राज्यांच्या काळात खानदेश कधीच स्वराज्यात सामील झाला नव्हता , हे येथे उल्लेखनिय ! )
त्याचे झाले असे कि ,
वाघाडी या गावातील बैल पोळ्याच्या वतनाच्या मानावरून हे प्रकरण घडले होते. या गावात बाहेरून येऊन गावात स्थानापन्न झालेल्या मथुरादास रूपदास धाकड वाण्याच्या सावकारीने उन्माद मांडला होता त्यातूनच पोळा सणाच्या दिवशी गावात मानपानाचे नाट्य रंगले ! यात चार जणांचा मृत्यू झाला तर व बावीस जण गंभीर जखमी झाले होते. या खटल्यात वाण्याकडे अमाप संपत्ती असल्याने त्याने मुंबईचे वकिल म्हणून बॅरिस्टर पारडीवाला यांना नेमले . तर प्रतिपक्षाचे *गुलाब दिनकर चंद्रराव भैरव-पाटील* यांच्याकडे ५२ गावे इनाम असूनही ते मात्र धनदौलत बाळगून नव्हते . यांना वकील कोण असावा ? यासाठी त्यांनी त्यांचे भाऊ रंगराव पाटील व त्यांचे मित्र साक्रीतील धाडणे गावातील नामदेवराव पाटील ( ब्राम्हणेत्तर पक्षाचे धूळे तालुक्यांतील आमदारकी चे पहिले उमेदवार) यांनी जळगावातील अच्युतराव अत्रे व शिरपूरच्या पंडीत वकील यांच्या सल्ल्याचे बॅरिस्टर वकील नेमायचे ठरले, त्यानुसार थेट बॅरिस्टर डॅा. बाबासाहेबांकडे वकील होण्यासाठी विनंती केली व ती त्यांनी स्वीकारलीही ! पुढे खटल्यासाठी बाबासाहेब चाळीसगाव पर्यंत रेल्वेने आले व पूढे त्यांना धूळे येथे नेण्यात आले. दरम्यान आदल्या दिवशी त्यांची राहायची व्यवस्था घरीच करायचे ठरले होते परंतु ॲडव्होकेट तवंर यांच्याकडे थांबायचे निश्चित झाले पण बाबासाहेबांनी एडीएम सर्किट हाऊसवर थांबायचं निर्णय घेतला.
बाबासाहेबांनी फक्त प्रवासाचे भाडे घेतले …
खटला सुरु झाला या खटल्यात एकूण १२२ साक्षीदारांपैकी फक्त चार साक्षीदार बाबासाहेबांनी तपासले. मुलकी प्रशासनानुसार गाव रामोशी , गाव कोळी , गाव कुंभार व गाव जमादार. खटल्याचा निकाल भैरव-पाटील यांच्याच बाजूने लागला परंतु खटला जिंकल्यानंतर बाबासाहेबांच्या फीसचा प्रश्न निर्माण झाला. कारण बॅरिस्टर जाल पारडीवालांची फी होती रू ५०००/- रुपये . त्यानुसार बाबासाहेबांनाही फीस द्यावी असे ठरवून पाटलांनी घरातील दागिने विक्री करून रक्कम जमा झालेली रू ३६००/- व पूर्वीचे शिल्लक रू २००/- अशी एकूण ३८००/- रू रक्कम बाबासाहेबांना देण्याचे ठरविले आणि सर्व जमा रक्कम त्यांच्या पुढ्यात ठेवली परंतु बाबासाहेबांनी मुंबई ते चाळीसगाव येण्या जाण्याचे रेल्वे भाडे रक्कम रू ६४/- घेतली व बाकीचे पैसे परत करत सांगितले की “ वकिली माझी जरी होती तरी खरी कसोटी इथून पूढे तूझी आहे. “ आणि खरोखर तसेच घडले पूढे त्यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नावर समग्र सकल मराठा नातेवाईकांनी १००% बहिष्कार टाकला. हे जावई जावई होते बाळासाहेब पवार . नंतर ते खासदार झाले . परंतु कूणालाही न जुमानता पाटलांनी लग्नातील भोजनाची पहिली पंगत गावातील मागासवर्गीयांना दिली. त्यांचे हे प्रेम आजही चालू आहे. पूढे डॅा बाबासाहेब कायदामंत्री झाल्यानंतरही पाटील दिल्लीला त्यांचा सत्कार करायला न विसरता गेले तेंव्हा डॅा. बाबासाहेबांनी त्यांना एक दिवस स्वतःच्या घरीच थांबवून घेतले.
‘ती’ लग्नाची पंगत दिवंगत खासदार बाळासाहेबांची !!
या खटल्याची आठवण यासाठी कि , ज्यांच्या लग्नात या खटल्याची किंमत पाटील कुटुंबियांना सामाजिक बहिष्कारातून चुकवावी लागली आज त्याच जावयाचे म्हणजे दिवंगत खासदार बाळासाहेब पवार आणि त्यांचे चिरंजीव मानसिंग बापू पवार आज सकल मराठा समाजाचेच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचे अग्रणी आहेत. आपल्या पत्नीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा थेट संबंध असतानाही बाळासाहेब पवार यांनी किंवा त्यांचे चिरंजीव मानसिंग पवार यांनी कोणतेही भांडवल न करता आपली समाजसेवा चालूच ठेवली. ती आजतागायत चालू आहे. आंबेडकरी समाज आणि सकल मराठा समाजाला सामाजिक पातळीवर बांधण्याचा प्रसंग म्हणून या खटल्याकडे जर बघितले तर या दोन्हीही समाजात सामाजिक सौहार्दाची असलेली भावना अधिकच तीव्र होईल हे या निमित्ताने महत्वाचे आहे.
समतेचा हा ऋणानुबंध आजही कायम आहे…
हा लेख आदरणीय दिवंगत खासदार बाळासाहेब पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक मानसिंग पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केल्यानंतर शिरपूचे प्रताप पाटील बाबा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , या लेखाशी संबंधित अजुन एक गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे , स्वर्गीय अप्पासाहेब (बाळासाहेब) यांचे सासरे दौलतरावजी भैरव पाटील यांचेवर पाटीलकीच्या वादावरून गाव चावडीवर खूप मोठा खुनी हल्ला झाला होता. आणि मारेकरी त्यांच्यावर हल्ला करुन पसार झाले, त्यात त्यांचे डोळे फोडले होते, तशा गंभीर अवस्थेत त्यांना गावांतील गाव कोळी आणि आंबेडकरी समाजाचे लोकांनी त्यांना घरी आणले होते आणि त्यांचे प्राण वाचवले होते. म्हणजेच ही जनता त्यांच्या मागे भक्कमपणे उभी होती आणि आजही आहे.
उल्लेखनीय म्हणजे ज्या चावडीवर दौलतरावजी भैरव पाटील यांचेवर हल्ला झाला होता ती चावडी सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची असल्याने कालांतराने तिची थोडी पडझड झाली होती परंतु दौलतरावांचे वंशज, जे आज गावाचे प्रमुख आहेत त्यांनी त्या चावडीची दुरुस्ती करून आजही त्याची आठवण जतन करून ठेवली आहे. विशेष म्हणजे समतेच्या ऋणानुबंधाची हि परंपरा जोपासत गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच मागास समाजातील व्यक्तीला गावाचा उपसरपंच केले होते.
बाबा गाडे
मुख्य संपादक, दैनिक महानायक औरंगाबाद
संदर्भ – बहिष्कृत भारत (ऑनलाईन मीडिया)