IndiaNewsUpdate : देशात टीकाकारांचा अभाव , जनतेचा आमच्यावर विश्वास : पंतप्रधान

नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांपासून आम्ही सत्तेवर आहोत .जनतेचा आमच्याबद्दल असलेला विश्वास आणखी मजबूत होत आहे. तसेच गेल्या सात वर्षातील कामगिरी ही देखील जनतेच्या विश्वासामुळेच साध्य होऊ शकली, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना काढले. कोरोनावरील कामगिरीबाबत मोदी यांनी विशेष भाष्य केले. ते म्हणाले कि , आपल्या देशात कोरोनावरील लस आली नसती तर किती भयानक परिस्थिती असती याचा विचार करा? जगातील एका मोठ्या लोकसंख्येकडे अजूनही कोरोनावरील लस नाही. पण भारताच्या लसीकरण मोहीमेने मोठे यश मिळवले आहे. आज आपण या क्षेत्रात स्वावलंबी झालो आहोत, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पूर्वी आपण एका विज्ञान संमेलानात जय जवान, जय किसान आणि जय विज्ञानचा नारा दिल्याची आठवण करून दिली.
कोरोनाला नियंत्रणात आणल्याचा दावा करताना ते म्हणाले कि , भारतीयांचे वेगाने होत असलेले लसीकरण हे धक्कादायक यश आहे. देश आता क्षेत्रातही स्वावलंबी होत चालला आहे. तंत्रज्ञान या लसीकरण मोहीमेचा कणा राहील, हे निश्चित केले जात आहे, असंही ते म्हणाले. सरकारच्या निर्णयांवर होत असलेल्या टीकेवरही पंतप्रधान मोदी बोलले. टीकेला आपण खूप महत्त्व देतो, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील ६९ टक्के लोकसंख्येला कोरोनाचा किमान एक तरी डोस मिळाला आहे. तर २५ टक्के लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशात आपल्या टीकाकारांची संख्या कमी
आपल्या विरोधात टीका करणारांना यानिमित्ताने उत्तर देताना ते म्हणाले कि , टीका आणि आरोपांमध्ये खूप फरक आहे. बहुतेक जण आरोपच करत आहेत. कारण त्यांच्याकडे मुद्द्यांवर बोलण्यासाठी फारसा वेळ नाही. कारण टीका ही गहन अभ्यासावर आधारित असते. आपण खुल्या मनाने टीकाकारांचा सन्मान करतो. पण दुर्दैवाने टीकाकारांची संख्या देशात अतिशय कमी आहे. बहुतेक जण फक्त आरोपच करत असतात. समजांवर आधारित खेळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. टीका करण्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. पण आजच्या वेगवान जगात लोकांना यासाठी वेळ नाही. म्हणूनच अनेकदा टीकाकारांचा अभावही जाणवतो, असे सांगत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
पहिल्यांदाच शेतकरी आंदोलनावर बोलले मोदी
देशात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही मोदी यांनी भाष्य केले . विरोधक, शेतकरी आंदोलना आडून सरकारवर निशाणा साधतात ते सांगून ते म्हणाले कि , अनेक राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देतात, जाहीरनाम्यातही समावेश करतात. पण आश्वासन पूर्ण करण्याची वेळ येते, तेव्हा तेच पक्ष यू-टर्न घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या आश्वासनांविषयी सर्व गैरसमज आणि खोटे पसरवतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या सुधारणांना विरोध करणाऱ्यांकडे पाहिले तर तुम्हाला बौद्धिक दिवाळखोरी आणि राजकीय फसवणुकीचा खरा अर्थ दिसेल. ‘ओपन’ मासिकाला त्यांनी ही मुलाखत दिली आहे.