MaharashtraNewsUpdate : अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लावला निकाल , ४२० उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज अखेर जाहीर करण्यात आला आहे. २०१९ साली ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनामुळे हा भरतीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर असल्यामुळे हा निकाल लागण्यास उशीर झाला होता. अनेक जणांना पद मिळूनही त्याच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. मात्र आता अखेर हा निकाल लावण्यात आला आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/j9zwBb78bI
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 28, 2021
साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून मानसी पाटील हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.तर रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे. रविंद्र शेळके हा परिक्षार्थी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे.
उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी, तहसीलदार पदांसाठी ही भरती घेण्यात आली होती.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या निकालात निवड झालेल्या एकूण ४२० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ते १५ जुलै, २०१९या कालावधोत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०१९ घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीमुळे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यामुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर गेला होता. मात्र आता अखेर शासन निर्णयानंतर हा निकाल लावण्यात आला आहे.
दरम्यान शासनाकडून आलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदे ही खुल्या प्रवर्गामध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत.सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल लावण्यात आला आहे.
यामध्ये खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.